मंगळवार, ३ मार्च, २०२०

फिदीफिदी-15 नका सोडून जाऊ रंग महाल..!

प्रति,
प्राणप्रिय, विकास पुरुष, देवाधीदेव, जगज्जेते आदरणीय मा. ना. मोदीजी साहेब...
                 

                पत्रास कारण की, जगभरातल्या अफवांनी डोक्याचा चुरा चुरा केला होता. तुमच्या ट्विटने अनेकांना कोड्यात पाडलं होतं. परंतु तुमच्या ‘लेटेस्ट ट्विट’मुळे कोड्याची उकल  आपसूकच झाल्याने सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या...तुम्ही सोडून जाता की काय असं वाटत असताना तसं काही होणार नाही हे कळल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय.  त्यामुळेच वाटलं की करावा तुमच्याशी वार्तालाप. आणि म्हणूणच हा सारा खटाटोप...तर साहेब...

               एखद्यानं तुमच्यावर अभ्यास करायचा म्हटलं तर खूप अवघड आहे. साहेब तुम्हाला समजून घ्यायचं म्हटलं तर आख्खं आयुष्य जाईल. अहो  मी तर म्हणतो की,  तुम्हाचा सेन्स ऑफ ह्यूमर समजून घ्यायचा म्हटलं तर सात नव्हे सातशे जन्म घ्यावे लागतील. अहो, काय ती तुमची अफाट विद्वत्ता..!  किती खोल... खोल.. विचार करता हो तुम्ही.! आम्ही विचार करत होतो 'नो मोदी नो ट्विटर'चा, अन तुमचा विचार 'शी इन्सपायर अस'चा. मानलं साहेब तुम्हाला यु इन्सपायर अस..!
           सुरुवातीला तर आमच्या पायाखालून जमीन सरकली हो. काय ते तुमचं ट्विट. पाया खालून जमीन सरकणे म्हणजे काय असतं हे तुमचं ट्विट वाचून अनुभवलं. मोदीजी अशी टिंगल आमच्या सारख्या पामरांची करत जाऊ नका. काल रात्रभर माझ्या नयनांमधून अश्रूंचे पाट वाहू लागले. काल रात्रभर झोप नाही लागली आहेब. तुम्ही ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर होते म्हणून मीही या महाजालात आलो. तुमच्या पोस्ट पाहूनच मी कायम प्रेरित व्हायचो. तुमच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीला हार्ट दिल्याशिवाय सकाळजी न्याहारी करत नव्हतो मी साहेब. आणि हो.. आताही करत नाही...!
          साहेब एक काळ होता. ऐन तारुण्यात नोकरीसाठी पेपरात जाहिराती चाळणं झालं की ‘शिला की जवानी’ पाहत बसण्यात वेळ जायचा. पण साहेब तुमच्या येण्याणं सारं जीवन पालटलं. आत मी पारावर बसून गाणे पाहत बसण्यापेक्षा विधायक कामं करतो. साहेब आता मी तुमचे ट्विट, तुमच्या पोस्ट माझ्या व्हाट्सअॅपवर ग्रुपवर शेअर करतो..! आयुष्यात समाधानी असणं महत्त्वाचं आहे. तुमची पोस्ट शेअर केली की कित्येक लाईक, कमेन्ट्स, आणि शेअर्स मिळतात हो मला... अजून काय पाहिजे आयुष्यात... पेपरात नौकरीची जाहिरात चाळून चाळून थकल्यावर, मोदी साहेब लवकरच दोन करोड रोजगार निर्माण करणार असल्याच्या पोस्ट मी 2014 पासून लाईक, शेयर करत आलोय. कदाचित स्वर्ग म्हणजे काय तो हाच असावा साहेब...
                    साहेब तुम्हाला कायम फॉल्लो करणारे माझ्यासारखेच असे कित्येक 'उद्यमी' आहेत या भारतात. कित्येकांना तुम्ही हा लाईक शेअर करण्याचा 'रोजगार'ही दिला आहे म्हणे. साहेब मिही त्याचा थोडा थोडा लाभार्थी आहे.    माझं जाऊद्या साहेब...! तुम्ही जर सोशल मीडियावरचे मिस्टर इंडिया झाले तर माझ्यासरख्या अनेकांचं कसं व्हायचं? असा विचार जरी आला तरी पोटात कालवायला लागलं होतं हो.!
              पण साहेब आम्ही काय शांत बसणाऱ्यांमधले नाही आहोत. तुम्हीच नाहीत म्हटल्यावर आम्ही तरी सोशल मीडियावर राहण्यात काय अर्थ? तुमच्या शिवाय आमचं अस्तित्व काय सांगा बरं? म्हणूनच आम्ही ठरवलं, आम्ही मुद्दामहून #IWillAlsoLeaveTwitter असा हॅशटॅग ट्रेन्ड केला.. एवढंच नाही साहेब तुम्ही नाही म्हटल्यावर आम्हाला ट्विटर पण नकोय.. माझ्यासारख्याच काही फॅन्सने #NoModiNoTwitter चा शोध लावला...! साहेब आयुष्यात कधी काय होईल काही सांगता नाही येत. एखादा छोटासा निर्णयही आयुष्याला मोठं वळण देणारा ठरू शकतो. तुमचा सन्यासाचा निर्णय म्हणजे धक्काच होता हो आमच्यासाठी. तुम्ही सन्यास घेत आहात म्हणून फडणवीस मॅडमपण सोशल मीडियावरून सन्यास घेण्याच्या मार्गावर होत्या म्हणे. आपल्या नेत्याला डायरेक्ट फॉल्लो करण्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे..? साहेब तुम्हाला आमची चिंता आहे हे सिद्ध केलंत तुम्ही. तुम्ही खरंच विश्वनेते आहात. तुमचं दुसरं ट्विट आलं आणि थोडं हायसं वाटल. तुम्ही सोशल मीडिया सोडणार नाहीत हे कळल्यानंतरच भाकरीचा तुकडा पोटात टाकला साहेब... साहेब खरंच तुम्ही महान आहात.... साहेब तुमच्या शिवाय आयुष्यात काही काही नाही... काल रात्रभर सगळं कसं शून्य-शून्य वाटत होतं हो. 
   रात्रभर विचार करत होतो की साहेबांचा मुखभंग एवढ्या लवकर झालाच कसा..? असं वाटायला लागलं की तुम्ही आता थकले. उद्विग्न झाले...या जल्पकांच्या टोळ्यांनी तुम्हाला हैराण केलं. तुम्हाला हे सोशल मीडियाचं आभासी आयुष्य नकोय... पण साहेब तुमचं ट्विट पुन्हा आलं...तुम्ही पुन्हा आलात...साहेब या जल्पकांना तुम्ही घाबरत जाऊ नका हो.. आम्ही आहोत की त्यांना सुतासारखं सरळ करायला..! तुम्ही बिनधास्त ट्विट करत जा हो..! जल्पकांचं कामच आहे ते..! आता हेच बघाना राहुल साहेबांनी तुम्हाला टोला मारला म्हणे..! म्हणाले की सोशल मीडिया नव्हे तर द्वेष सोडा..! पडले की तोंडावर..! आणि ते पडले जरी नसते तर आम्ही होतोच की त्यांच्यासोबत कुस्ती खेळायला...!
       जाऊद्या साहेब आम्हाला विश्वास होता तुम्ही एवढ्या सहजासहजी रंगमहाल सोडून जाणार नाहीत..! आम्हाला पक्कं वाटलं होतं की असं अचानक सोडून जाणार नाहीत. तुमची ही शंभर टक्के गुगली असणार. तुम्ही नोटबंदीसारखा यावेळीही काहीतरी मोठा धमाका करणार. क्षणासाठी असं वाटलं होतं की, यावेळी देशभक्तीचं काहीतरी मोठं सत्कार्य आमच्या हातून घडणार आहे. नोटबंदीच्या वेळी रांगेत उभं राहून देशभक्ती सिद्ध करण्याचं आवाहन आम्ही केलं होतं ना, याही वेळी तसाच संदेश घराघरात पोहोचवण्याच्या तयारीत होतो आम्ही. मी तर दहा बारा देशभक्तीच्या पोस्टीही लिहूनही ठेवल्या होत्या. सुदैवाने त्याची गरज पडली नाही. 
           जाऊद्या साहेब बाकी काहीही असो.. मी मात्र चिंतामुक्त झालो. आता पुन्हा नव्याने लागतो कामाला..! पुन्हा नव्याने पोस्टींग, शेअरींग करतो..! तेही जोमात...!


तुमचाच सच्चा भक्त
संत बाताराम



-------------–---–-–––---------–---------------------------

प्रज्वल ढगे
4 मार्च 2020
बुधवार
Prajwaldhage98@gmail.com

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...