उन्हाळ्याचं ऊन जसंजसं तेजाळत होतं,तसंतसं आंग घामाचे पन्हाळ वकू लागलं.बळीराजानं आपलं रान नागवं करून उन्हाला तापवित बसिवलं होतं. कुठंतरी साळुंखी आपला चिवचिवाट करून लपलपल्या अंगाला आडूसा शोधत होती.बेभान सुटलेलं वारं, उन्हासंग शिवाशिव खेळत होतं. दोघजन मिळून रंग्याच्या घरी असणाऱ्या लिंबाला कानाखाली मारून गदागदा हालवीत होते.हालीवल्या सरशी पिकलेल्या लिंबोळ्या जीव सोडून जमिनीवर आपलं डोकं फोडून घेत होत्या.खाली लिंबोळ्यावर माशांचा थर साचला होता.लिंबाखाली एका कोपऱ्यात लाकडी बाजावर आपलं मळकं गोधडं आथरून सुगंधामाय घोरू लागली.तिच्या उशाला असणाऱ्या मळक्या लुगड्याच्या चिंध्या आण फाटक्यातुटक्या बोनदऱ्या मधी बांधलेली बॉटल,तिची होत असलेली आबाळ दाखवत होती.बाजच्या पायथ्याला बुधवड्यातली तांबडी कुत्री हापहाप करून लाळ गाळीत पडली होती.
पावसाळा आन उन्हाळ्यात मानसायची किलकील असणारा हा बुधवडा सुतक आसल्यावणी शांत आणी निपचित पडला होता.दूधपिते पोरं दूध तोंडात घेऊन आपल्या आईच्या कुशीत निपचित पडले होते.शहाणे-सुरते आपापल्या परीनं स्वतःला गर्मीपासून वाचावीत होती.वाड्यातली तरणीबांड पोरं गावात चाललेल्या लफडयांच्या गप्पा करीत आईच्या पारावर बसली होती.ही पोरं आख्या गावाची मायभईन इथंच एक करीत !कोन कोणाच्या मागं? कोण कोणाला आवडतं ,हा सारा प्रपंच याच पारावर होत असे.
पोरांची मैफल जमली.कचरू,नाम्या,सुभान,दादाभाऊ,राज्याभाऊ, सगळेजण गप्पा मारीत बसले होते.मधीच सुभाण्या काहीतरी चाळा करी आन साऱ्या गल्लीची शांतता त्यांच्या हासण्यामुळे खड्ड्यात गाडल्या जाई. दुपारच्या एक वाजल्यापासून यांची मैफल रंगलेली,ती आणखीनच रंगत-रंगत पार सूर्य बुडायला लागेपर्यंत चालूच होती. शेवटी सुर्यदेवानं आपलं उन्हाचं जाळं कमी केलं आणि गार वारा सुटायला लागला.आता कंबरेचा कना कुरकुर करू लागला.बसून-बसून पोरं कटाळली. सगळ्यांना घराची आस लागली. सांजच्यापारचा चहाचा वास नाक व्यापु लागला.सगळ्यांनी अंग झटकलं.सगळे उठू लागले.
तेव्हड्यात,
" ये कुठं हाईस रे ?" वाऱ्याच्या झुळूकीसंग रडकुले आणि हुंबत असलेले तुटक-तुटक शब्द,राज्याच्या कानाला स्पर्ष करून गेले.
"ये, तुम्ही काही आईकिलं का?"राज्यानी बाकीच्या पोरांना विचारलं.सगळ्यायनी आडव्या माना हालविल्या.
राज्या आणखिनही ती किंकाळी इसरला नव्हता,वेदनेने भरलेला त्यो आवाज आणखिनही राज्याचं मस्तक सोडीत नव्हता.तो उठला आपलं बुड झटकून पायात ती खिळे मारलेली चप्पल घालू लागला.सगळे निघायला लागले.
"लवकर यी रे$$$$$$" हवेशी झुंज करत हा आवाज मात्र सगळ्यायचं काळीज चिरून गेला.राजुच्या काळजात पाणी भरलं.डोळेही पाण्यानं डबडबले.ह्यो आवाज सगळ्यायनी आईकिला होता.राजुचे डोळे पाण्याने भरले.कुणाचाही ईचार न करता आईच्या देवळाच्या दहा-बारा पावलावर असलेल्या त्या बोळीतून, तो सुसाट वेगानी पळत सुटला.त्याच्या मागोमाग सुभान,नाम्या,सारे दगडु लागले.सगळ्यांची पावलं एकाच जाग्यावर रुतली.फेंदारलेल्या डोळ्यायनी सगळे एकटक पाहू लागले.समोरचं ते दृश्य पाहून कोणाला काहीच उमजेना.
ती ,'बनामाय' होती.हाड आन मास एक झालेली बनामाय!!!!!!
एका खोकल्याच्या उबाळीसंग ती बाजाऊन खाली पडली होती.कुत्र्यायनी उखरलेल्या मातीत तोंड खुपसून उसासे टाकीत होती.तडफडत होती!!बाजूच्या दगडावर डोकं आदळल्यामूळं सुजून पार कांड्याइतकं भाईर आलं होतं. आधीच बुधवाडा गावाच्या भाईर!आन त्यात पार गल्लीच्या ढुंगणाला दोन-चार हाताच्या बोळीपलीकडं शासनानं बनामायला राहायला घरकुल देलं होतं. त्या घरकुलात ती एकटीच राहायची.सारी पोरं डबडबल्या नजरेने त्या घराकडं पाहत होते.एकमेकांकडे पाठ करून जमीन फाडून निघालेले लिंबं पार आभाळाला भिडले होते.घरकुलाच्या दोन खोल्यायपुढं एक बारीक खूजं खोपटं म्हतारीनं स्वतासाठी बनवलं होतं. समोरचं आंगण कोंबड्यायनी उखरून उखरून पार खरूज आल्यागत केलेलं.त्या टीचभर खूरुड्यात जाण्याची कोणाचीही हिम्मत होईना! कोणीही त्या म्हतारीकडं जाईना.झोपड्यातून येणारा तो घाण दर्प पोटात ढवळाढवळ करत होता.राजेभाऊचं मन शांत बसत नव्हतं.त्याची धकधक अजूनच वाढत होती.शेवटी बेंबीच्या देठापासून त्यो ओरडला
"चला रे बनामायला भाईर आणू, जायची मरून बिचारी!"
बनामाय हुंबु लागली "कुठं गेलास रे, कव्हा येशील!"
शेवटी राजेभाऊच पुढं गेला,वाळलेल्या पऱ्हाटीवानी आपल्या दोन्ही हातात त्या हालक्या झालेल्या बनाआक्काला त्यानं उचलून आणलं.लिंबाच्या सावली खाली, त्या खरजूल्या मातीत,त्यानं तीला बाहेर आणलं.बाकीच्यांच्या जीवात जीव आला .सगळेजण हालचाल करायला लागले.दादाभाऊ अस्ताव्यस्त झालेलं लुगडं सावरीत होता.कोपऱ्यात ठेवलेल्या मान मोडक्या डेऱ्यातून सुभान पाणी घेऊन आला.त्यो मळकटलेला गिलास तसाच्या तसा बनामायनं आपल्या तोंडाला लावला.घट घट असा पाण्याचा आवाज येत होता.पाणी तिच्या पोटात जात होतं. तसा राजेभाऊच्या जीवात जीव येत होता.म्हतारीचा जीव हापकत होता.वर सांजचा सोसाट्याचा वारा ,आन उरातील खोकला बनामायला स्थिर होऊ देत नव्हता.
"काय झालं बना आक्का,कामून बोंबलू लागली खुळ्यागत!."काळजातली भीती लपवीत राजेंभाऊनं शब्द फेकला.
म्हतारीला स्वास घेणपन अवघड होऊ लागलं.त्या गटमटीत तीन आपलं दात नसलेलं तोंड इचकिलं, आन हासल्यासारखं केलं.हे हसणं,हसणं नव्हतं! ते होतं, एक मुक्त होत असल्याचं समाधान!ते होतं एका एका मुक्त आकाशात जाण्याचं स्वीकारलेलं आमंत्रण!पोरांच्या काळजाचा ठोका वाढला.साऱ्यांना भडभडायला लागलं.राजेभाऊच्या डोळ्यांत पाणी तरळलं .बुबळायवर आसवांची झालर आली.त्या झालरीवर बनामायच्या आयुष्यातील चित्र उभे राहू लागले!!!!!!!!!!!
बनामाय! गावच्या मरीआईला सोडून दिलेली देवदासी होती.भर जवाणीत ,भरल्या अंगानी तीनं आपल्या जवानीला जपत आईची सेवा केली.ती आईला रोज शेंदूर लावी.रोज तीचं झाम्पर बदली.सणासुदीला हिरवा चुडा अर्पण करी.पुनवलां,एकादशीला निवद आन चपात्या आईपुढी ठेवी.तिचं लग्न झालं होत.सोपान सोबत,हा सोपान जन्मताच अपंग.त्याला काही काम होत नसायचं.आईपुढी आलेल्या निवदावरचं ती कशी बशी जगायची.सोपान हा काही साधा नव्हता.त्याला अधून मधून घुरं येई !आन त्या धांदलीत त्यो बनाईला पार ढोरागत मारी.कंबरात मांडीवर कुठंही लाकडं मारी,नखांनी ओरबाडी. आन बनाई मुक्या गाईसारखी ओरडायची.हे मार खानं तिच्या जन्माला पूजल्यालं. असचं एका दिवशी बनामाय चुलीजवळ चहा करू लागली.ती आपल्याच धुंदीत होती.अचानक सोपाननि तिचे केस धरले.आन तिला मातीत घोळसू लागला.बनामायला कळलं की,त्याला घुरं आलं म्हणून!ती ठणठणा बोंबलू लागली .सोपान गप-गप म्हनून तिचं तोंड दाबू लागला.पण बनामाय दाद देत नव्हती.शेवटी सोपानआण्णा जवळ पडलेली फुकणी घेतली.आन फाडकन बनामयच्या थोबाडावर मारली.एकामागून एक त्यो तिच्या तोंडावर त्या लोखंडी फुकनिणे मारू लागला.बणाईचं तोंड रक्तानं माखलं. सारा बुधवाडा जमा झाला.सगळे आण्णाला धरू लागले.पण त्यो हत्तीवणी आडदांड !तो कुणाला आवरेना!बणाई तोंडाला हात लावून जोरा जोरात बोंबलू लागली.सगळी भावकी हळहळू लागली.बनामयची सगळी बचाळी फुकणीच्या मारासंग भाईर पडली होती.तिचे रक्तानं माखलेले दात मातीमध्ये विखुरले होते.
पुढं सोपान अण्णांचं आजरपन वाढलं.त्याच्या शेवटच्या दिवसात आण्णा इलाज आन भाकरिपाई आळ्या पडून मेला.ह्या येड्या नवऱ्यासंग तीन आखा जन्म काढला.त्याचा मार, राग,सगळं काही सोसलं. आन देवानही तिला दुःखाच्या सागरात आनंदाचे मोती दिले.सोपाना पासून तिला भरपूर लेकरं झाले.दहा लेकरं !! सरेंच्या सारे पोरचं!पन बापावानीच सगळे भूकमरी आन गरिबीपाई मेले.बनामायला वाटायचं एक तरी लेकरू जगावं.ती देवासमोर हात जोडायची.त्याला इनवायची. आपल्या आईमायला ती नवस बोलायची.पोटचा गोळा जगावा म्हणून चंद्रपुराला आणवानी पायांनी जायची.काय माहीत कशामुळं पण आईमायनं एक सुद्धा लेकरू जिवंत राहू दिल नाही.या तिच्या लेकरायला कव्हा भाकर मिळायची नाही.पोरं दारोदार जाऊन भीक मागून खात. कधी कोणी वाळलेले कुटके देई,तर कोणी हुसकावून लावी.असाच एक पोरगा सित्या पार मोठा झाला होता.चांगला लग्नाच्या वयात आला होता.पोटाची आग शमवण्यासाठी त्यानं आईपुढचे निवद खाल्ले.आन काय माहीत काय झालं?सीत्याच्या पोटात उमचळायला लागलं.आन पाय खोरून,भीतीवर डोकं आपटून त्यानं आपला जीव सोडला .पुढं एवढ्या मोठ्या घरकुलात बनामाय कैदासीनिवाणी एकटीच राहू लागली.
सारा इतिहास राजेभाऊच्या डोळ्यात भरत होता.त्याचे डोळे पाण्याने डबडबले.लहान लेकरासारखा तो ढसाढसा रडू लागला."आर काय झालं रे राजू?आसं कामून रडतुयास?येईन न त्यो? राजुला भान आलं.त्यानं पटकन डोळे पुसले.त्यो आणेबा होता,तिचा अकरावा मुलगा सोपान अण्णांन तिला दहा लेकरं दिले.आणेबा अकरावा होता. धाकट्या जाऊचा मोठा मुलगा. तो शहरात मास्तरकीच शिक्षण घेऊ लागला.पार दोन वरीस झाले पण त्यानं गावात पाऊल ठेवलं नव्हतं. पैसे लागले तर ,फक्त बनामायला पत्र पाठवित असे.आलेलं पत्र राजेभाऊं तिला वाचउन दाखवी. बणाई आनंदानं पत्र आलं म्हणून ,होईल तेवढं करून पैसे देई.आण राजू इमानदारीनं ते पैसे आणेबाच्या नावानं मनी ऑर्डर करी.
आज पाच महिने झाले,ना आणेबाचं पत्र ना तार!!!
म्हतारिचा जीव फक्त एकाच आसेवर जगतोय.आज पत्र येईल.उद्या माझा आणेबा मला भेटायला येईन.दिवसामागून दिवस जात होते.आणेबाचं पत्र येत नव्हतं.आणेबाची चाहूल लागत नव्हती.
आता म्हतारीचा श्वास घाबरा झाला.बणाई बोबडी बोलू लागली.तिची दमछाक होऊ लागली.तश्या स्थितीत तीनं राजुचा हात धरला.आन बोलू लागली."राजा तू जाय!त्याला घेऊन यी." राजेभाऊं उठला.त्यानं पुन्हा डोळे पुसले.आलेला घाम कॉलरणी पुसला.शेम्बडान भरलेलं नाक मातीत शिकरलं. आन बोलू लागला ...."हो आजे .....मी आत्ता जातो.. त्याला आत्ता घेऊन येतो...तुला काहीही होणार नाही.तू काळजी करू नकु...."
सूर्य मावळतीला लागला होता.मऊ वारं वाहू लागलं.म्हतारीचा श्वास थांबत होता.
आन........
राजेभाऊं आणेबाला आणायला आणवानी पायानी धावू लागला......
तळटीप- ही कथा काल्पनिक असून.या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत.कुठल्याही सत्य घटनेशी कसलाही संबंध नाहीं. संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा..........
प्रियानुज ढगे
Priyanoojdhage@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा