गोंधळातून गरूडभरारी...
मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध्यक्षांना पत्र पाठवून त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे एकाअर्थी अभिनंदनीयच आहे. पक्षांतर्गत लोकशाहीला बळकट करण्यासाठी उचलेल्या या पत्रपावलाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहीजे. आमच्याकडे विविध पदनियुक्त्यांसाठी निवडपद्धती ही ‘शतप्रतिशत लोकशाही’ पद्धतीची असते, असं प्रत्येक पक्षाकडून छातीठोकपणे सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांची अंतर्गत परिस्थिती कशी आहे हे आपण जाणतोच.
आजच्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत जो काही गोंधळ झाला तो एकाअर्थी स्वागतार्हच आहे. राहूल गांधींनी पत्र लिहणाऱ्या 23 जणांवर भाजपसोबत मिलीभगत असल्याचा आरोप केल्यानंतर माजलेला हाहा:कार आणि राहूल गांधी यांना झालेला विरोध हा काँग्रेसमध्ये लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. ज्या पक्षात विरोधी मत मांडायला जागा असते, तो पक्ष लोकशाहीत नेहमीच सुदृढ असतो. राहूल यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यावर आरोप करावे आणि बैठकीतच थेट ट्विट करून सिब्बल यांनी राहुल यांच्या वक्तव्याचा समाचार घ्यावा ही काही लहान गोष्ट नाही. बैठक चालू असतानाच पक्षाच्या पूर्वाध्यक्षांच्या वक्तव्याला समाजमाध्यमांवर सार्वजनिक स्वरूपात उघडपणे विरोध करायलाही धमक लागते. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्या प्रखर विरोधानंतर राहुल गांधी यांना माघार घ्यावी लागली. आपण असं काहीही बोललो नाहीत असंही स्पष्टीकरण राहुल यांना द्यावं लागलं. काँग्रेसच्या बैठकीत आज घडलेल्या घटना खूप काही सांगून जातात. काँग्रेसमध्ये अजूनही विरोधी मताचा सन्मान केला जातो. काँग्रेसमध्ये व्यक्तीकडे असलेल्या अधिकारांचा अमर्याद वापर केला जात नाही असाही संदेश एकाअर्थी आज काँग्रेसने भारतीय जनतेला दिला आहे.
आता कल्पना करुया की काँग्रेसच्या बैठकीत झालेला हाच गोंधळ भाजप पक्षात झाला असता तर? किंवा अशाच स्वरूपाचा गोंधळ भाजपमध्ये होणे शक्य आहे का? देशाची सत्ता हातात असलेल्या भाजप पक्षाची सत्ता मोदी-शाहा या जोडगोळीकडे आहे. मोदी-शाहांच्या भाजपमध्ये खंडनमंडणाचे प्रकार घडल्याचे अजूनतरी ऐकीवात नाही. अमित शाहा, नरेंद्र मोदी यांच्या मर्जीविरुद्धच्या कामाला भाजपमध्ये परवानगी नाही. कुणी असा प्रयत्न केलाच तर संबंधित पामराचा कार्यभाग बुडालाच म्हणून समजा. मोदी-शाहा म्हणतील तीच पूर्व दिशा अशी परिस्थिती सध्या भाजप पक्षात आहे. पक्षात हुकुमशाही कारभार असणे हे कधीही घातकच. पक्षातील हुकुमशाहीमुळे देशाची दुहेरी हानी होते. एक तर पक्षांतर्गत लोकशाही नसल्याने समजातील प्रत्येक स्तरातील नेतृत्वाला संधी मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मर्जितल्या माणसांना पोसल्याने देशाबरोबरोच पक्षाचाही विकास, विस्तार, आणि व्यापकता खुंटते. परिणामी पक्ष कुजण्यास सुरूवात होते. हुकुमशाही कारभारामुळे पक्षाची दीर्घकालीन हानी होणे अटळ असते. भाजप पक्ष सध्यातरी ऐन बहरात आहे. त्याच्या भक्कमतेस सध्यातरी कुठलीही हानी नसल्याचं दिसतं. सद्यस्थितीला काँग्रेसला झालेला मुडदुस हे पक्षांतर्गत हुकुमशाहीचंच फळ आहे. तर सध्याचा भाजप पक्षाचा एकाधिकारशाहीग्रस्त वर्तमान, भाजपचा भाविष्यकाळ वाळवीग्रस्त असण्याचा पूर्वसंकेत आहे.
आता मुद्दा गांधी कुटुंबावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांचा. तर आजच्या बैठकीतला गोंधळ काँग्रेसच्या गरूडभरारीचे प्राथमिक लक्षण का समजू नये..?
प्रज्वल राजाभाऊ ढगे. (पत्रकार)
मो.-9923959974, 8999468742
Mail- prajwaldhage98@gmail.com