सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

रात अकेली है- मर्डर मिस्ट्रीची संथ कहानी...

रात अकेली है- मर्डर मिस्ट्रीची संथ कहानी...

          मर्डर मिस्ट्रीला केंद्रस्थानी ठेवून आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले. गूढ आणि रहस्यमयी कथानक असलेल्या काही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली. तर कथानक डावं, किंवा दिग्दर्शकाला कथेला न्याय देता न आल्याने काही चित्रपट आपटल्याचे आपण पाहिलेलं आहे. कोरोना महामारीच्या या काळात ओटीटी मंचावर वेबसिरिजबरोबरच चित्रपटांचेही प्रदर्शन सुरू झाल्याने इथेही भयकथा (हॉरर), गूढ (मिस्ट्री), रहस्य (सस्पेन्स) अशा आशयाच्या चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली आहे. नेटफ्लिक्सवर 31 जुलैला प्रदर्शित झालेला, नवाजुद्दीन सिद्दिकीची मुख्य भूमिका असलेला रात अकेली है हा चित्रपटही अशातलाच एक.
         चित्रपटाच्या सुरुवातीलाच रघुवीरची पत्नी आणि वाहन चालकाचा खून होऊन पुढल्याच क्षणी चित्रपट थेट पाच वर्षे पुढे जातो. पुढच्या काही मिनिटांत पिढीजात धनाढ्य असलेल्या रघुवीर सिंहचा त्याच्या लग्नाच्या दिवसशी खून होतो. बालपणी झालेला अत्याचार आणि दोन वेळा करावं लागलेलं अबॉर्शन असह्य झाल्याने सज्ञान वसुधा (शिवानी रघुवंशी) रघुवीरचा खून करते. अर्थात गूढकथा असल्यामुळे या खुनाची उकल सर्वात शेवटी होते. आपल्या भाचीवर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या रघुवीर सिंहच्या (खालीद तैबजी) खुनाची उकल, खऱ्या मारेकऱ्याचा शोध, हेच चित्रपटाचे कथानक आहे. रघुवीरचा खून कुणी केला? राधा (राधिका आपटे) खुनासाठी खरंच जबाबदार आहे का? नोकर चुन्नीला खुनासंदर्भातले नेमके कोणते गुपितं माहिती आहेत? या प्रश्नांची उत्तरं तसेच बालवयातील वसुधावरील अत्याचार, वसुधाने घेतलेला सूड, वसुधाला वाचवण्यासाठी जटिलने लढवलेली शक्कल चित्रपटात प्रत्यक्षपणे पाहणेच इष्ट आहे. 
       चित्रपटातील मुख्य पात्र जटिल यादव (नवाजुद्दीन सिद्दिकी) पोलीस आहे. चित्रपटात खुनाच्या तपासाचे काम आपल्याकडे आल्याने जटील तपसाचे काम पूर्ण ताकदीनीशी करतोय. तद्दन चित्रपटांत नायक जसा निडर, धैर्यशिल असतो; अगदी तशाच प्रकारे जटिलसुद्धा धाडसी आहे. जटिल राजकीय व्यक्ती, वरिष्ठांचा दबाव झुगारून आपल्या कर्तव्याला प्राणपणाने जोपासनारा पोलीस आहे. एकीकडे खुनाचा तपास आणि दुसरीकडे चांगला जोडीदार मिळावा म्हणून रघुवीर सिंहच्या खुनाच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या राधाला (राधिका आपटे) आपलं करण्यासाठी जटिलची तळमळ चित्रपटात पाहण्यासारखी आहे. तपासाच्या धांदलीत जटिल-राधाची वाढत जाणारी जवळिक, त्यांचं फुलत जाणारं प्रेम चित्रपटात प्रत्यक्षात पाहणंच आनंददायी आहे.
       राधाचं भावविश्व चित्रपटाच्या आशयचौकटींना छेद देतं. राधा खून झालेल्या रघुवीरची दुसरी पत्नी आहे. वडिलांनीच विकल्यामुळे स्वता:च्या कोशात दु:खी, कष्टी होऊन जगणं राधाला सोयीचं वाटतं. त्यातच प्रियकर विक्रम सिंगकडून (रघुवीर सिंहचा भाचा) झालेल्या उपहासामुळे राधाचं अधिकच खच्चिकरण झालेलं दिसतं. इच्छेविरुद्ध होणारं लग्न, आणि लग्नाच्या दिवशीच पतीचा झालेला खून यामुळे राधा अधिकच एकलकोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्या सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या अवहेलनेमुळे राधाला आपलं हक्काचं असं कुणीतरी हवं आहे. आपल्या म्हणवणाऱ्या माणसाच्या शोधात असतानाच राधाच्या आयुष्यात जटिल येतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात जटिलच्या येण्यानं राधा काहीशा प्रमाणात सुखावलेली पाहायला मिळते. कथानकात जटिल आणि राधाचं प्रेम रघुवीरच्या खुनाच्या तपास प्रक्रियेत समांतरपणे फुलत जातं. पुरूषी अहंकारी मानसिकतेतून राधावर झालेले अन्वनित अत्याचार, समाजाकडून होत असलेली अवहेलना हे सारं काही पचवणारी राधा निधड्या छातीची महिला आहे. समाजिक दृष्टीकोनातून राधा चारित्र्यहीन असली तरी स्व:तचा आत्मा शुद्ध, आणि पवित्र ठेवणारी राधा प्रेक्षकांच्या मनात स्वता:साठी सद्भावना, आणि आदर पेरून जाते. त्यापेक्षाही राधाचे असलेले विवाहबाह्य संबंध माहित असूनही जटिलचा राधावर जडलेला जीव आपल्याला अधिक सुखकारक वाटतो. जटिलची आधूनिक विचारांशी असलेली जवळिक आपल्याला विचार करायला लावते.
       नवाजूद्दीनने जिवंतपणा आणण्यासाठी भूमिकेत जीव ओतलेला आहे. राधिका आपटेचाही तेवढाच कसदार अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. राधा आणि जटिल चित्रपटाचे मुख्य पात्र असले तरी, चित्रपटात इतर किरदारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. किंबहूना इतर पात्रांच्या असण्याशिवाय कथा पूर्ण होऊ शकलीही नसती. खुनाची उकल झाल्यानंतर प्रत्येक पात्र किती महत्त्वाचे होते हे चित्रपटाच्या शेवटी कळते. वसुधाने रघुवीरचा खून केल्यानंतर सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करणारी वसुधाची आई प्रमिलाही (पद्मावती राव) चित्रपटात तेवढीच महत्त्वाची आहे. घरातली नौकर चुन्नी (रिया शुक्ला), विक्रम सिंग (निशांत दहीया), एमएलए मुन्ना राजा (आदित्य श्रीवास्तव) यांच्या असण्यालाही तेवढंच वजन आहे. रिया शुक्ला, निशांत दहीया, आदित्य श्रीवास्तव यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिेला आहे. दिग्दर्शक हॉनी त्रेहानने प्रत्येक क्षण चाणाक्षपणे एकमेकांत विणलेले पाहायला मिळतात. चित्रपटात छोट्या-छोट्या गोष्टींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एकमेकांशी संबंध आहे. एखादी गोष्ट पाहायची राहून गेली तर चित्रपटाची उकल न होण्याचा धोका अधिक संभवतो. प्रसंग अतिरिक्त जरी नसले तरी दीड तासांच्या ‘फास्ट चित्रपटाच्या’ काळात, अडीच तासांचा हा चित्रपट काहीशा प्रमाणात रटाळ आणि लांब वाटतो. चित्रपटाची वाढलेली लांबी कथेची गरज आहे हे मान्य जरी केलं, तरी कथानक अगदी संथगतीने समोर जात असल्यामुळे चित्रपट कधी संपेल असंही कधीकधी वटून जातं. सहनशीलता, आणि कुठलेही थ्रील नसलेले चित्रपट पाहण्याची सवय नसलेल्या प्रेक्षकांना रात अकेली है हा चित्रपट अगदीच रसहीन वाटू शकतो. उत्तर प्रदेशातील संस्कृती, राहणीमान, बोलीभाषा अशा साऱ्या गोष्टींवर दिग्दर्शकानं मोठं काम केल्याचं चित्रपट पाहिल्यानंतर कळतं. रात्रीचे दृश्य जास्त प्रमाणात असल्याने चित्रपटातील वातावरण भकास वाटते. त्यात एकही गीत नसल्यामुळे भकासपणात आणखी भर पडते. एकुणात रटाळ, रसहीन वाटत असला तरी ‘रात अकेली है’ हा चित्रपट एकदा पाहण्यास हरकत नसावी.
 
चित्रपट- रात अकेली है 
रेटिंग-⭐⭐⭐ 
दिग्दर्शन- हॉनी त्रेहान
संवाद, कथा, पटकथा-  स्मीता सिंग 
कलाकार- नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, निशांत दहीया, शिवानी रघूवंशी, तिग्मांशू धुलीया, आदित्य श्रीवास्तव, श्वेता त्रिपाठी


प्रज्वल ढगे
9923959974
prajwaldhage98@gmail.com

४ टिप्पण्या:

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...