फिदीफिदी- 13
नमस्ते डोनाल्ड ट्रम्प...!
आहो तुम्ही काहीही म्हणा. आमच्या प्लॅनिंग कमिटीचं काम जोमात सुरूय. आदरणीय नरेंद मोदी जेव्हापासून देशाचे पंतप्रधान झालेले आहेत, तेव्हापासून देशाचं वजनात 'प्रकर्षा'ने वाढ झालेली आहे. मोदींच्या सत्तेत येण्याने देशाच्या परराष्ट्र व्यवहाराला नवी झळाळी मिळाली तर आहेच पण मोदी या नावातच अनोखी जादू असल्यामुळे आज सगळं विश्व आपल्याकडे आदराने पाहू लागलं आहे. तुम्हाला हे सगळं काही खोटंच वाटणार. पूर्वग्रहदूषित, कलुषित मनं असलेले तुम्ही लोक आदरणीय मोदी साहेबांना कधीच नितळ नजरेतून पाहणार नाहीत. तसंही तुम्ही मोदी साहेबांकडे आदराने पाहा किंवा नका पाहू, आमच्यासाठी मोदी हे कायम शिरसावंद्य होते...! शिरसावंद्य आहेत...! शिरसावंद्य राहणार...!
मोदी नावात वजन असल्यामुळेच ( छप्पन इंची छाती असणाऱ्या माणसाच्या नावात वजन असलंच पाहिजे) जगात महासत्ता असणारी अमेरिका आज आपल्या देशात येण्यासाठी आसुलेली आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतभूमीवर पाय ठेवण्यासाठी तरसत आहेत. तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटणारच नाही. कारण तुम्ही देशप्रेमाप्रती निष्क्रीयच आहात. तुमच्या माहितीस्तव ट्रम्प साहेब आपल्या देशाच्या दौऱ्यावर दोन दिवसांसाठी येणार आहेत. वॉशिंग्टन येथे ट्रम्प साहेब ( ट्रम्प तात्या म्हणायचं नाही. सन्मान द्यायचा त्यांना. दे पाहुणे आहेत आपले.) माझ्या स्वागतासाठी अहमदाबादेत 70 लाख भारतीय येणार आहेत' असं मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. हा एवढा पराकोटीचा अभिमान तो काय उगीच आहे का...? भारतीयांकडून स्वागत होणं म्हणजे आजकाल परदेशी लोकांना अभिमानाची गोष्ट वाटतेय. म्हणूनच ट्रम्प साहेब एवढ्या अभिमानाने त्यांच्या स्वागताच्या मधुर कहाण्या आख्ख्या विश्वाला सांगत आहेत.
एवढं मोठं रामायण ऐकविण्याचं दुसरं काही कारण नाही.. फक्त आमच्यावर जे आरोप झाले ना त्यांना खोडून काढण्यासाठी, या आरोपांना उत्तर देण्यासाठी हा खटाटोप आहे. आम्ही लोकशाहीप्रेमी आणि लोकशाहीला जीवापार जपणारे लोक आहोत. तुमच्या विरोधाला आम्ही उत्तर देणारच. आम्ही ते आमचं परम कर्तव्य समजतो. तर मी म्हणत होतो की एवढ्या मोठ्या देशाच्या एवढ्या मोठ्या महनीय व्यक्तीचं स्वागत करायचं म्हटलं तर तयारी नको का करायला..? एवढ्या मोठ्या तयारीसाठी थोडा फार खर्च नाही का होणार..? आता 100 कोटी खर्च केले याची टिमकी वाजवत बसण्यापेक्षा याच शंभर कोटींच्या निधितून आम्ही किती जनहीताचे 'मेगा प्रोजक्ट' हाती घेतले हे ही जाणून घ्या जरा..! ट्रम्प साहेब अहमदाबादेत उतरणार आहेत. साहेब उतरल्याक्षणी त्यांना भारत भूमीत सगळं काही मजेत, आलबेल असल्याचं कळायला नको का..! तुमच्याच इंदिरा गांधींनी 1971 च्या निवडणुकीत गरिबी हटाव चा नारा दिला होता. मात्र आतापर्यंत काँग्रेसला गरिबी संपवता आली नाही. आता या गोष्टी निस्ताराव्या लागणार की नाही. 'राष्ट्रीय गरिबी हटाव कल्याणकारी योजने'तून झोपडपट्ट्यांभोवती भिंत उभारली तर काय वावगं केलं. आजकाल प्रत्येक सोसायटीला आपलं हक्काचं असं संरक्षण कुंपण असतं की नाही..? झोपडपट्ट्यांच्या गरिब जनतेला असंच हक्कांच कुंपण तेही फुकटात बांधून दिलं तर त्यात काय बिघडलं. त्यांनाही चोऱ्या, लुटमार, दरोडे यांच्यापासून संरक्षण मिळेल, आणि आपला देश गरिबांची कशी विशेष काळजी घेतो याचा साक्षातकारही ट्रम्प साहेबांना होईल..! यात चूक ती काय..?
'ट्रम्प कपल' सायंकाळच्या शांत समयी तेजोमहलाला (?) भेट देणार आहे. तेजोमहलाच्या (?) साक्षीने ट्रम्प कपल प्रेमाच्या चारपाच गुलाबी गोष्टी करू शकतं. त्यात अजून ट्रम्प मॅडमला जर यमुनेच्या 'निर्मळ जळात' पाय रोवून पाण्याचा थंडावा अनुभवत ट्रम्प साहेबांसोबत पाऊट करून चार-पाच फोटो काढावेसे वाटले तर यमुनेचं पाणी तलम, निर्मळ आणि स्वच्छ नको का वाटायला..! मग गंगेचं छोटूसं पाणी यमुनेला दिलं तर काय फरक पडतो. एवढ्या मोठ्या तेजोमहला (?) समोर पाऊट करून फोटो काढत असताना जर यमुनेची दुर्गंधी ट्रम्प मॅडमच्या नाकात शिरली तर त्यांच्या फोटोसेशनचा खेळखंडोबा नाही का होणार..! या साऱ्या शक्यता लक्षात घेता यमुनेची दुर्गंधी लपवण्यासाठी जर गंगामाईचं पाणी यमुनेत सोडलं तर काय ती चूक केली.?. यावर एवढं मोठं रणकंदण करण्याची काय गरज..? तुम्हाला दीड फुटांपर्यंत पाणी यमुनेत सोडण्याचा हा निर्णय फारच टोचत असेल तर या पाणी सोडण्याच्या योजनेला ‘नमामी गंगे’सारखं ‘नमामी यमुने’ असं नाव द्या हवं तर..! काय म्हणता..?
बाकी कोणे एकेकाळी काँग्रेसच्या नेहरूंनी ड्वाइट आयसनहॉवर यांना भारतात आणलं होतं. इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सॉन यांना भारतात बोलावंल, जॉर्ज बूश, बराक ओबामा यांना सिंग साहेबांनी भारतभेटीला बोलावंल. तेव्हा आम्ही असंच बोललो का..? आम्ही घेतला का तुमच्या खर्चाचा धांडोळा..? त्यावेळच्या तुमच्या खर्चाची आम्ही चौकशी करायला घेतली तर नेहरू घराण्याची ( काँग्रेसची नव्हे , कारण नेहरू घराणं म्हणजेच काँग्रेस आहे, असं आम्ही समजतो...) कित्येक गुपीतं बाहेर येतील, तुमच्या आतापर्यंतच्या खर्च़ातून हजारो कुटुंबातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून दारिद्य्र हद्दपार झाले असते.
आधीच सांगून ठेवतो. आम्ही आदरणीय ट्रम्प कपलला सोन्याच्या ताटात मिष्टान्न आणि चांदीचा वर्ख असलेल्या टी-ट्रेमधून 'चहा' देण्याचं ठरवलं आहे. चहामध्ये प्रचंड जादू असते. चहाने कित्येकांना मोठमोठ्या हुद्द्यावर नेऊन ठेवलं आहे. 'चहा विकणारे' आज करोडपती झाल्याचे कित्येक उदाहरणं आहेत. मग ट्रम्प साहेबांना 'चहाची संस्कृती' असलेल्या देशात चांदीच्या कपात चहा दिला तर गोंगाट करण्याचं काही कारण नाही. चहावर आमचं खूप प्रेम आहे. ट्रम्प साहेबांना आम्ही सोन्याच्या ताटात जेवू घालणार आणि चांदीच्या कपात चहा पाजणारच..!
बाकी तुम्ही आमच्या समोर कितीही मोठा दंगा करा, टीका करा. आम्ही हे विकासकाम करणार. आम्ही 'केम छो डोनाल्ड ट्रम्प'..! नाही नाही 'नमस्ते ट्रम्प...' म्हणणार म्हणजे म्हणणार....!
प्रज्वल ढगे
23- feb- 2020
रविवार
खूप छान सगळ्यांना धुवून काढलं...
उत्तर द्याहटवाKeep It up Prajwal. Great work 🤣
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाडोनाल्ड ट्रम्प साहेबांच्या स्वागताची तयारी करा साहेब मोदी #चांदीच्या कपात चहा #सहसंबंध ��
उत्तर द्याहटवालिहीत राहा....��������
उत्तर द्याहटवाटोचणी जबरदस्त प्रज्वलजी।
उत्तर द्याहटवा