तुझ्या अस्तित्वाच्या खुणा आजही मी जपतो आहे...
तुझ्या कर्तृत्वाच्या विशाल अश्या पर्वतासमोर
मी कायम नतमस्तक आहे..
तू समतेच्या बुरुजाची भरणी करून
आमच्या असण्या-नसण्याची राखण केलीस
या राखणीमुळेच मी आज उभा आहे
या असंतुलित,विभाजनवादी परंपरेत
तू या परंपरेला,अस्पृश्यतेला मूठमाती दिलीस खरी
पण आजही तिची जळमटं,पाळंमुळं
तितकीच त्यांचं राक्षसी अमनुशत्त्व सांभाळून आहेत
तुझ्या आभाळभर काबाडकष्टाची
आजही होते पूजा चौकाचौकात..
तुझया कर्माचे गुणगान पेपर भरून
छापायला कुणीही कमी करत नाहीत
पण एक सांगू भीमा..
तू ज्या व्यवस्थेला लथाडून
तिला मारायला उठला होतास
ती कागदोपत्री मेली खरी...
पण आज तिचं फक्त स्वरूप बदललं
तिचं रंग,रूप,दिसणं, असणं बदललं
तुझी लेकरं आजही भोगतात
तो पिळवणुकीचा अखंड अभंग
तुझ्या लेकरांच्या मनात आजही
तुझी तेवढीच आस आहे..
तू आम्हाला शिकायला लावलस
त्या शिक्षणाचे पाईक होण्यासाठी
ती व्यवस्था आता तुझ्या कल्पनेतली उरली नाही..
तुझं विश्व फार वेगळं होतं..
तू लढत होतास,आणि जिंकतही होतास
तुझ्या महापरिनिर्वाण दिनी मला एकच हिम्मत दे
तुझ्यासारखं लढण्यासाठी मला बळ दे
तुझ्या महापरिनिर्वाण दिनी मला
हिम्मत दे..
तुझ्या महापरिनिर्वाण दिनी मला
या व्यवस्थेत पुन्हा नव्याने
समता
स्वातंत्र्य
आणि बंधुता
प्रसउदे...
तुझ्या महापरिनिर्वाण दिनी मला फक्त हीच शक्ती दे...
प्रियानुज (प्रज्वल ढगे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा