फिदीफिदी 14
आम्हीच मराठीचे कर्तेधर्ते..!
जागतिक मराठी भाषेच्या दिनानिमित्त खास ‘शुद्ध मराठी’ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आता व्याप मोठा असल्याने कार्यक्रमाला मोठ्या मंडळींची हजेरी तर असणारच. मंचकावर फुलांच्या माळा, हार, ध्वनिक्षेपकाची चाचणी ( माईक टेस्टिंग नव्हे) वगैरे-वगैरे काम बाकी असल्याने कार्यक्रमाला शून्य सेकंदाचा वेळ आहे. मंचाच्या मागे ( जीथे मीडियावाल्यांचे कॅमेरे जात नाहीत) दिग्गज पाहूण्यांच्या गप्पा रंगल्या आहेत. चंदूदादा, देवेनदादांच्या हातून सत्ता निसटल्यापासून त्यांना पित्ताचा त्रास सुरू झाल्याने दोघेही गंभीर चेहरा करून बसले आहेत. तर उद्धोदादा, अजूदादा मस्तपैकी चहा बिस्कीटांचा आनंद घेत आहेत. चंदूदादा, देवेनदादा आपला रुसवा फुगवा लपवण्याचा प्रयत्न करत डोळे बारिक करून चहाचा झुरका सुर्रर्रर्रर्रर्र कण घेतात. आणि चर्चेला सुरुवात होते....
चंदुदादा : काय यार किती वेळ कार्यक्रमाला...? (चीडचीड करुन चहाचा घोट घेत)
उद्धोराव : ‘यार’ नव्हे ‘मित्र’ म्हणा. आपल्याला मराठी वाढवायची आहे, जगवायची आहे..! ( चहा पित पित गंभिरपणे)
मित्र शब्द ऐकताच देवेनदादांचं पित्त खवळलं. त्यांनी रागात उद्धोदादांकडे पाहिलं आणि दात खात-खात चहाचा घोट घेतला.
देवेनदादा : नाही नाही चंदूदादा; तुम्ही ‘यार’च म्हणा. असंही दोस्तीला आजकाल कवडीची किंमत राहिलेली नाही.
देवेनदादाच्या बोलण्याने उद्धोदादाच्या काळजाला शीळ टोचल्यासारखं झालं. अंगभर झिणझिण्या उठूनही उद्धोदादांनी सगळं काही आलबेल असल्याचा आव आणला.
उद्धोदादा : असं कसं... दोस्ती दोस्ती असते. काय म्हणता अजूदादा..?
अजूदादा : एकदम बरोबर... दोस्तीला सीमा नसतात... मानसाने कुणाशीही दोस्ती करावी...मी तर कुणाशीही दोस्ती करतो ब्वा... मला नवे नवे दोस्त करायला फार आवडतात... एका रात्रीत मी कुणाशीही दोस्ती करत असतो... काय म्हणता देवेनदादा. बरोबर ना..?
अजूदादांचे शब्द ऐकताच देवेनदादा भूतकाळाच्या पोटात गेले. देवेनदादांना एका रात्रीत भेटलेला तो 'जिगरी दोस्त' आठवला. आपल्या मित्राची आठवण येताच देवेनदादांच्या पोटात कालवलं. दोस्ताची आठवण झाल्यामुळे चीडही आली. कारण एका रात्रीत मैत्री करणारा मित्र देवेनदादांना पहिल्यांदाच भेटला होता. त्यांना वाटलं की कमीत-कमी अर्धं दशक तरी आमचा मैत्रीभाव टिकून राहील. पण दिवस उजडताच भेटलेल्या दोस्ताने हातावर तुरी दिल्या. त्याच तुरीचे चटके त्यांच्या हाताला अजूनही बसत होते. चटके बसून बसून काळेनिळे झालेले हात लपवत देवेनदादा चहाचा कप ढवळत बोलू लागले.
देवेनदादा : बरं जाऊद्याहो ते... मी असं ऐकलंय की शाळेमध्ये काहितरी सक्तीचं होणार आहे म्हणे..? (भाल्यासारखी टोकदार नजर करुन तीच नजर त्यांनी आजूदादांकडे फेकली)
आजूदादा बोलणार तेवढ्यात...
उद्धोदादा : काहीतरी म्हणजे काय..? काय म्हणायचं काय आहे तुम्हाला.? आम्ही आमची मायमराठी सक्तीची करतोय...विद्यार्थ्यांनी ती शिकलीच पाहिजे ! आपल्याला माय मराठीचा अभिमान असलाच पाहिजे...! काय म्हणता अजूदादा..? (खड्या आवाजात मराठीचा उच्च आणि पराकोटीचा अभिमान असल्याचे दाखवत )
अजूदादा : हा मग... एकदम बरोबर. मराठीचा अभिमान असायलाच हवा...ती आपली ओळख आहे...आपण आपापल्याला घराघरात मराठी पेरली पाहिजे..! मराठी सक्तीची झालीच पाहिजे..! (आपल्या कणखर आवाजात)
चंदूदादा : हो का...! मराठीचा एवढा अभिमान आहे म्हणायचा तुम्हाला..! बरोबर बरोबर..! मराठी प्रत्येकाने वाढविलीच पाहिजे. त्यासाठी आपल्या घरात भाषण ठोकणाऱ्या व्यक्तीला मराठी आली नाही तर, त्याला इंग्रजीमध्ये मराठी भाषण लिहून दिलं पाहिजे..! पण त्याला मराठीमध्येच बोलयला लावलं पाहिजे...विदेशात शिक्षण झालं म्हणून काय झालं...इंग्रजीतून मराठी शिकायला पण हिंमत लागते... बरोबर ना अजुदादा..?
आजूदादा : आ...हो...हो... बरोबर बरोबर... ( आपल्या पार्थ बाळाची आठवण आल्याने खोकरत खोकरत)
मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असलेले आजूदादा अडचणीत सापडतायत म्हटल्यावर उद्धोदादांनी चर्चा आपल्याकडे ओढली आणि बोलू लागले.
उद्धोदादा : अजून मराठी वाढवायची असेल, तर आपल्याला मराठी सक्तीसोबतच आपले मौलिक जुने ग्रंथ विद्यापीठांमध्ये अभ्यासायला ठेवायला पाहिजेत...यासाठी लवकरच महत्त्वाचा निर्णयसुद्धा होणार आहे... (विद्यापीठांचे ओसाड पडलेले मराठी भाषेचे विभाग, पीएचडी मिळवून मिस्त्री काम करणारे डॉक्टर लोकं यांची आठवण आली. तरी देखील आपलं माप झुकू द्यायचं नसल्याने आपला चस्मा वर करत.)
देवेनदादा : नाही हो... शिक्षणाला घेऊन काय करता..? आता कोण जातंय विद्यापीठांत..! मी म्हणतो की कुसुमाग्रजांच्या कवितांपासून ते लतादीदींच्या मधुर गाण्यांपर्यंत मोठेमोठे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. मराठी गीतांना मंच दिला पाहिजे, मराठी गायकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हल्ली मराठी कुठेच ऐकायला भेटत नाही... एवढेच नव्हे... मी तर म्हणतो की.. मराठी वाढवण्यासाठी...( वाक्य पूर्ण करणार, तेवढ्यात देवेनदादांना आठवलं की, आपल्या अर्धांगिनीचं बिग बिंसोबत 'शुद्ध हिंदी' गीत, आणि नेमकंच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 'शुद्ध इंग्रजी' गाणं प्रसारित झालं आहे. आपण अजून जास्त बोललो तर गोत्यात येऊ. त्यामुळे वाक्य अर्धवटच राहिलं, नव्हे नव्हे ते ठेवलं.)
आता अजूदादांचं नेहमीप्रमाणे डोकं फिरलं. आणि अजूदादा रागात येऊन बोलू लागले.
आजूदादा : आम्ही काय करायला हवं ते आम्हाला सांगण्याची गरज नाही. ( उद्धोदादांकडे पाहत) आम्हाला मराठी वाढवायची कशी अनं जगवायची कशी? हे सगळं काही माहिती आहे. (देवेनदादा, चंदूदादांकडे पाहून बोचरी टीका केल्याच्या सुरात)
अजूदादा : मराठी भाषेची टिमकी वाजवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करणासाठी 2013 साली आम्हीच समिती नेमली होती... तुम्ही काय सांगता आम्हाला...(चहा संपल्याने कप खाली ठेवत)
चंदुदादाही काही कमी नाहीत. अजुदादांच्या या थेट हल्ल्याने चंदूदादा बिथरले. पण स्वतःला सावरत चंदूदादा बोलू लागले...
चंदूदादा : हो... हो... कुणाला शिकवत बसायला आम्ही काही रिकामे नाही... आम्ही आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी झगडणारच होतो... आम्ही अभिजात दर्जा देणारच होतो... पण काहीतरी अघटीत घडलं...तिघांनी येऊन धिंगाणा घातला.. आणि सगळंच राहून गेलं... नाहीतर आज तुम्हाला आम्ही बोलुही दिलं नसतं... कळलं का..! ( गेलेली सत्ता, आणि अजूदादांच्या थेट बोलण्याने चंदूदादांना राग आला त्यामुळे मोठ्या कर्कश आवाजात.)
वातावरण गरम झालं. सगळ्यांचा चहा पिऊन झाला.
देवेनदादा : काय केलं हो तुमच्या गव्हर्नमेंटने मराठीसाठी..? ( रागात)
उद्धोदादा : गव्हर्नमेंट नव्हे सरकार म्हणा..! ( शांतपणे)
देवेनदादा : हो तेच तेच...! काय केलं तुम्ही ( अजुदादांकडे पाहत)
अजुदादा : हो सांगतो तुम्हाला.. थांबा.. (कंगवा काढून आपले केस विंचरत)
आता वातावरण जास्तच पेटलं. पेटलेल्या वातावरणाची धग मंचापर्यंत गेली. आयोजकांनी हेरलं की काहीतरी गडबड होणार. विषय संपवायचा म्हटलं तर आपल्यालाच काहीतरी करावं लागणार, हे आयोजकाने हेरलं. बाकी सगळे कामं बाजूला ठेवून अजूदादा काही बोलायच्या आत आयोजकांचा आवाज आसमंतात घुमला...
हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!
हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!
कार्यक्रम सुरू होतोय. सगळ्यांनी मंचाकडे यायचं आहे. प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं...!
हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!
हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!
आता बोलून काही फायदा न्हवता. सगळीकडे चुळबुळ सुरू झाली होती. अजूदादांनी ओठांतला शब्द तसाच पोटात गिळत देवेनदादा चंदूदादाकडे कटाक्ष टाकला. आणि इच्छा नसताना शांत झाले. आणि आम्हीच मराठीचे खरे उद्धारकर्ते असल्याचा आव आणत चौघेही शांतपणे मंचाकडे चालू लागले...!
( सूचना :यातील सर्व पात्र काल्पनिक आहेत. काल्पनिक पात्रांचा कुणाशीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संबंध आला तर तो निव्वळ योगायोग आहे. बाकी काहीही नाही)
प्रज्वल ढगे
9923959974
Prajwaldhage98@gmail.com
दिनांक- 72- फेब्रुवारी- 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा