आक्रमण...!
(एक्झिट पोलचा बाण राजमहालाचे सुरक्षा कवच तोडून थेट राजदरबारात जाऊन खुपसला आहे. सगळ्या प्रांताचे सुभेदार मनसबदार, जातीने उपस्थित राहिलेले आहेत. संपूर्ण दरबाराचा थरकाप उडाला आहे. तेवढ्यात......)
होशियार....$....$...$
समशेरबहादूर..…$ रुस्तुमेजंग....$ जंगबहादूर....$ राजाधिराज...$ महाराज...$ नरेंद्र मोदीजी पधार रहे है.......$$$$ ( दरबानाने आरोळी ठोकली )
नरेंद्र महाराज खाड खाड पावलं वाजवीत दिल्ली दरबारात येऊन पोचले. सर्व मुलुखांचे मालक, राज्याचे मंत्री, फौजदार, शिलेदार यांना आधीच घाम फुटला होता. हा सारा मोहोल बघून ते हैराण झाले. त्याणी एक्झिट पोलच्या बाणाकडे जळजळीत नजर फेकली. आकडेवारी पाहून त्यांचे डोळे पार आस्मानासारखे पांढरे झाले.
महाराज मोदी :- ऐसे कैसे जाहले..! आमची मोदी लाट सरली म्हणायची का आता..? काय म्हणावं या सगळ्या गोष्टींना..! (महाराजांना प्रचंड थरकाप भरला आहे. घामाने भरलेल्या अंगाने )
सरदार शाहजी बहादूर :- आपुल्या पाच मुलुखात नेमकाच आपल्या प्रजेने मतदान केले. याच रयतेचा आपल्या खबऱ्यांनी नोंदवलेला हा कौल आहे. (मन खाली घालून मुजरा आटोपल्यानंतर )
महाराज मोदी :- असे कसे जाहले..? आमच्याशी असला बरताव कशी काय करू शकते आमुची रयत ...? (आलेला घाम रुमालाने पुसत )
सरदार शाहजी बहादूर :- महाराज रयत प्रचंड दुखावली आहे. त्यांच्या मनी बंडाचा कट शिजतोय असे कळते आहे .( मान वर न करता )
महाराज मोदी :- नाही जे असंभव आहे...! हे कदापि होऊ शकत नाही ...! आमुची प्रजा आमच्याशी नाखुश राहतेच कशी..? आमजी गगनाला भिडणारा विकास केला. विकास हाच आमुच्या राज्याची राजमुद्रा होती. आम्ही स्वतःला एक विकासपुरुष म्हणवून घेतो...! तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे सरदार..! ( विकास आठवल्यामुळे शहरांची बदलली नावे आणि उभारलेले पुतळे यांच्या लिस्टकडे पाहत )
सरदार शाहजी बहादूर :- महाराज आपुली वाणी शंभर मोहरा सत्य आहे. परंतू खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आपुल्या काही मुलुखांना वळिंबा लागण्याच्या मार्गावर असल्याचे कळत आहे..! ( मोठ्या कष्टाने )
महाराज मोदी :- काय म्हणता आहात सरदार...! वळिंबा..! कोण मुलुख म्हणावे हे ..? (वळिंबा हा शब्द नवीनच ऐकल्यामुळे महाराजांना जरा जास्तच कालवलं )
सरदार शाहजी बहादूर :- राजे ते मूलूख म्हणजे मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ इत्यादी इत्यादी... .! ( इत्यादी इत्यादी वर विशेष जोर देऊन )
महाराज मोदी :- शत्रूंनी घात केला म्हणावयाचे की काय मग ...? ( सरदारांच्या इत्यादी मुळे जरा जास्त रागात येऊन )
सरदार शाहजी बहादूर :- होय महाराज..!दुष्मणाने घात केला...! काँग्रेसचा शहजादा राहुल आपल्याला शह देण्यास स्वारीवर निघालेला आहे. तीन मुलुखांत चांगला जम बसवून त्याने दिल्लीकडे कुकज केल्याचे कळते आहे...! ( हे सर्व सांगताना महाराज आपल्याला तर हत्तीच्या तोंडी देणार नाहीत ना ? या भीतीने शाहजी थरथरत आहेत.)
महाराज मोदी :- घोर अनर्थ....! शत्रूचा घाला आला...! ( महाराजांच्या तोंडी हे शब्द ऐकताच संपूर्ण दरबार बिथरला. सगळ्यांनी डोळे मोठे केले. आता काय होणार हे कुणालाही कळायला मार्ग नव्हता नाही )
सरदार शाहजी बहादूर :- आता काय होणार महाराज आपुल्या सल्तनतचे....! (सरदार प्रचंड टेन्शनमध्ये )
महाराज मोदीजी :- काय म्हणजे .…! चला...! उठा..! हत्यारं काढा...! भाले काढा...! तलवारी काढा...! तोफा काढा...! दारुगोळा तयार ठेवा ...! शत्रूला ठेचावयास हवे...! (अर्थात भाले, दारुगोळा,हत्यारं, तलवारि म्हणजे पैसा,रत्न, विकासासारखं एखादं अभ्येद्य कवच.दुसरं काही नाही )
मोदी महाराजांनी आदेश सोडला सर्व मंत्री, सरदार, सुभेदार, शिलेदार, कामाला लागले. सर्वांनी विकासासारखे आणखी दुसरे हत्यार बनवण्यासाठी आपापली बुद्धी तासायला सुरुवात केली. तेवढ्यात समोरून पुन्हा एकदा महालाचे सर्व सुरक्षा कवच तोडीत एक बाण आला. त्या बनासोबत हवेत शब्द येत होते. ते संपूर्ण दरबारात घुमत होते. ते शब्द होते.. 'चौकीदार ही चोर है' , 'ये है सूट बूट की सरकार' , 'मेरा राजा चोर है' , 'विकास पगला गया है' ........!!
प्रियानुज (प्रज्वल ढगे )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा