शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

गीतांजली-निराकारास वाहिलेला एक काव्यसंग्रह.....!

लिट्रेचर कट्टा
सदर क्रमांक-०२
प्रज्वल ढगे (प्रियानुज)

गीतांजली-निराकारास वाहिलेला एक काव्यसंग्रह.....!

मनुष्य हा नेहमी स्वतःच्या संकल्पना स्वतःच बनवून जगत असतो.स्वतःचे मत आणि निष्कर्षांच्या सभोवती फिरण्यात तो कायम मग्न असतो.रोजच्या धकाधकीच्या आणि अधांतरी जीवनात तो सुख शोधून जगत असतो.मानव स्वतःविषयी चिंतन आणि मनन करण्यास एक उत्तम व्यसपीठ म्हणून ईश्वरास पाहत असतो.ईश्वरीय भक्तीत लिन होऊन स्वतविषयीच्या प्रश्नांचे उत्तर शोधणे त्याला नेहमीच आवडते.तिथेच माणसाच्या सत्य,असत्याचा चोखंदळ अभ्यास होऊ शकतो.याच आशयाचा आणि याच परिघात फिरणाऱ्या कवितांचा संग्रह म्हणजे "गीतांजली" हा काव्यसंग्रह होय..!या काव्यसंग्रहामुळे टागोरांनाच नाही तर संपूर्ण भारतास वैश्विक स्तरावर एक मानाचं आसन प्राप्त झाले.गीतांजलीमुळेच भारतीय संस्कृतीचे आणि मानवतेचे गोडवे गायले जाऊ लागले.
टागोरांचे बरेचशे कविता संग्रह आहेत.परंतु ते सर्व पडद्यामागे राहून गीतांजली हा कवितासंग्रहच त्यांची ओळख बनला.या कवितासंग्रहात एकूण १०३ कविता आहेत.गीतांजली वाचताना टागोरांचा विचारपट उलगडत जातो.गीतांजलीची प्रत्येक कविता टागोरांना ठळक आणि गडद करत जाते.त्यांच्या ईश्वरीय संकल्पना,मानवजातीविषयक विचार आणि जाणीव,गीतांजलीमध्ये प्रखरतेने जाणवत राहतात.हेच गीतांजलीचे वैशिष्ट्य आहे.यातील संपूर्ण कविता वाचकाला ईश्वरचरणी घेऊन तर जातातच त्याचबरोबर जगण्याचं गमकही शिकवून जातात.टागोर त्यांच्या कवितेत ईश्वरास कधी बाप संबोधतात तर कधी मित्र/सखा म्हणतात.यावरून टागोर हे ईश्वरास निर्माता तर समजतात. पण त्याच बरोबर त्याच्या अधिपत्याखालीन राहता त्यास आपला मित्र बनवू इच्छितात.गीतांजलीत टागोर हे निर्मिकाचे फक्त गोडवेच गात नाहीत त्याच्या वास्तव्याची घणाघाती कविताही लिहितात.ईश्वराचा व्यापार करून स्वतःच लबाड पोट भरणाऱ्या भामट्यांना ते कवितेतून फटकारतात. मुर्ती बनवणाऱ्यास ते "लबाड कलाकार"म्हणून जणू ईश्वर हा मूर्तीत नसून अंतर्मनी असल्याचे सांगतात.मंदिरास ते भग्न देऊळ म्हणतात.तर मूर्तीच्या कृपेवर जगणाऱ्या पुजाऱ्यासही ते सोडत नाहीत.अश्याच एका वेगळ्या थाटणीची कविताही गीतांजलीमध्ये वाचावयास मिळते.गीतांजली वाचून टागोर आपणाला सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की जीवन खूप सुंदर आहे.जगण्यावर प्रेम करा.त्याचा गोडवा हा मधासारखा आहे तो चाखत राहा.भुरट्या भक्तीस विरोध करताना टागोर गीतांजलीत स्वताला मात्र शेवटपर्यंत ईश्वरभक्तच म्हणतात.स्वताला कायम त्याच्या उपकारात ठेवतात.स्वताला त्याचा सेवक मानतात.तोच सर्वस्वी आहे हे गीतांजलीमध्ये प्रकर्षाने जाणवते.
गीतांजली हा ईश्वराभोवती फिरत न राहता माणसाचं जगणं कसं असावं हेही सांगून जातो.अगदी सोप्या आणि सहज भाषेत ते सांगतात की माणूस हा जिवणप्रेमी असावा तो जर फक्त आवास्तववाद आणि श्रुंगार दुनियेत जगत असेल तर तो माणूस म्हणून जगण्याचं गमक आणि आनंद गमावतोय.मानवाच्या संपूर्ण आयुष्यात फक्त मानवतावादी भूमीका असावी याच भूमिकेतून त्याने आपले संपूर्ण आयुष्य काढावे हेच टागोर गीतांजलीमध्ये सांगतात.ते म्हणतात की,

राजपुत्रासारखा उंची नि अंगभर पोशाख केलेल्या
आणि रत्नजडित सुवर्णालंकार घातलेल्या
बालकाला बालसुलभ मुक्त खेळाचा आनंद घेताच येत नाही
त्याचा जामानिमा त्याला पदोपदी अडवत राहतो.

याच कवितेत शेवटी टागोर म्हणतात की,

सामान्य माणसाच्या महान जीवणयात्रेत
प्रवेश करण्याला प्रतिबंध करणाऱ्या
आशा पाशभूत दागिन्यांचा काय उपयोग...?

टागोरांच्या कवितेत सुखी जिवनाचा सार आहे.त्यांच्या कविता काव्य,संगीत,स्वर,सूर,निसर्ग,प्रेम,दया, नदी,ईश्वर,यांना सोबत घेऊनच जन्मलेल्या दिसतात.या गोष्टी कधी रमणीय म्हणून समोर येतात.तर कधी भयानक आणि रौद्र रूप सोबत घेऊनच कवितेत प्रवेशतात.टागोर मानवी स्वभावाचे वर्णन करतात आणि शेवटी आपल्याला प्रश्न पाडून जातात की या कवितेत आपण येतो का..?आणि जर या कवितेचा आपल्या जगण्याशी संबंध जुळला की आपण विचार करू लागतो.ईश्वरभक्तीचे सोंग आणून,त्याची उपासना करण्याचा थोतांड अभिनय करून ईश्वरास लुटणाऱ्यांचा उल्लेखही त्यांनी एका कवितेत केला आहे.टागोर हे प्रखर देशभक्त होते हे सर्वश्रुत आहे.ईश्वराला संबोधून ते त्यास देशासाठी मागतानाही दिसतात.ते म्हणतात "माझा देश त्या स्वतंत्र स्वर्गात जागृत होवो."या स्वतंत्र देशाची संकल्पना मांडताना ते म्हणतात की "माझ्या देशातील माणसांची मान ही ताठ आणि उंच असुदेत."गीतंजलीती"ल कविता या स्वतंत्रप्रिय तर आहेतच.त्याचबरोबर माणसाचे मन शुद्ध करणाऱ्या कविताही वाचकांस वाचयला मिळतील.शेवटी १२ते १५ कविता या मृत्यूला शोधताना आपण पाहतो.मृत्यू म्हणजे काय याची कल्पना काही कविता देतात.मृत्यू हा निरपेक्ष असतो आणि त्याला सर्वांना सामोरे जावेच लागेल.हेही ते सांगतात.गीतांजलीतील कविता या मृत्यूला कवटाळणाऱ्या आहेत.तो अगदी रमणीय आहे.सुंदर आहे असेच टागोर सांगतात.मृत्यूचे आभार मानत एका कवितेत ते म्हणतात की"मृत्यूलाही सामोरे जावं, त्याचे स्वागत करावे,जीवनाला 'क्रीडांगण' म्हणणारा हा कवी आयुष्याचा खेळ कसा खेळावा हे सांगण्याचा प्रयत्न करतो.
शांततेचे नोबेल मिळालेल्या या अवलीयचा हा गीतांजली वाचून माणूस कृतार्थ तर होतोच,आणि जगण्याची नवी उमेद घेऊन खरा माणूस म्हणून जगण्याला सुरुवात करतो.मानवीय जीवन जगण्यासाठी,तसेच ईश्वर आणि मानव यांचा धागा ओळखण्यासाठी मराठीतून अनुवादित केलेला हा काव्यसंग्रह एकदा वाचावाच.

पुस्तकाचे नाव-गीतांजली
लेखकाचे नाव-रवींद्रनाथ टागोर
प्रकाशन-रिया पब्लिकेशन, अजब डिस्ट्रिब्युशन
किंमत-२७०




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...