शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

नकाब...!

"नकाब........!"

उन्हाच्या झळा सपासप अंगाला लागत होत्या.रस्त्याने चालताना धूळ अंगाला घामामुळे चिटकत होती.डोक्यावर पांढरा रुमाल घेऊन, मी माझ्या घराकडं जाण्यासाठी तडफडत होतो.बस स्टॉप वर थांबून बस ची वाट पाहत बसलो होतो.डोळे ती "लाल परी" पाहण्यासाठी आसुसले होतो.थकलेला असल्यामुळे सगळं काही निरर्थक वाटत होतं.समोर उसाचा रस पिऊन लोकं तृप्तीचा ढेकर देत होते.रसवंतीचा मालक घुंगराच्या तालावर उसातला रस मशिनमधून पिळून काढत होता.उसाचा जीव घेऊन माणसाचा जीव वाचवला जात होता.रस्त्यावर रिक्षांची गर्दीच गर्दी माजली होती.रिक्षा मालक समोरून जाताना उगीचच डोळे उचकीत मला कुठं जायचं म्हणून विचारत होता.मी त्यांना नकार देऊन पुरता वैतागला होतो.मान हलवून हलवून ती पार मोडायला आली होती.बसायला जागा नव्हती म्हणून मी खुर्चीच्या बाजूला टेकन देऊन उभा होतो.
मी बसच्या शोधात होतो.सध्या बस पेक्षा मला कुठलीही गोस्ट प्रिय नव्हती.आता ती माझी प्रेयसी झाली होती.या क्षणी तिच्यापेक्षा जास्त प्रेम मी कुणावरही करत नव्हतो.माझी नजर माझ्या प्रेयसीला शोधत होती.आणि ती मला काही दिसत नव्हती.ती कधी येईल आणि मी कधी तिच्यात बसून तृप्त होईल असे मला झाले होते.उन्हामुळे घसा कोरडा पडला होता.जिव पाणी पाणी करत होता.बसथांब्यावर म्हातारे माणसं सावलीच्या शोधत होते.होती नव्हती जागा तरण्या बांड पोरींनी व्यापली होती.चेहऱ्याला स्कार्फ लावून आपली काया त्या उन्हात लपवत होत्या.
या मुलीही खूप चालाक असतात.आपली काया लपवून तरण्या पोरांना झुरवायला यांना वेगळाच आनंद भेटतो.त्या '"प्लकिंग" केलेल्या रेखीव भुवया दाखवत पोरांचे काळीज चिरण्याचा त्यांना भारीच आनंद भेटतो.एवढ्या उन्हात जिथेकी घामाचे पन्हाळं लागलेले असताना तो स्कार्फ बांधून त्यांना काय दाखवायचं असतं काय माहिती.त्या स्वतःची खूप काळजी घेतात ?की हे बघा मला घाम येत नाही ?कदाचित यांपैकीच काहीतरी असावं स्कार्फ बांधण्याचं कारण......!?
शेजारीच एक पाणी पुरीचा ढेला लागला होता. ढेल्याच्या मालकाने भर उन्हात त्या काळ्या मडक्याला लाल कापड लावलं होतं.ते ओलं कापड त्या काळ्या मडक्याला गारवा देत होत.अधून मधून तो मालक त्या मडक्यावरच्या कापडावर पाणी सिपडीत होता.आणि माझं मन जाळीत होता.मलाही असाच गारवा मिळावा.माझ्यावरही कुणीतरी पाण्याचे तुषार टाकावेत असं मला वाटत होतं.तो ढेल्याच्या भोवतालचा गारवा पाहून लोक त्याच्याकडे येत होते.आणि पाणीपुरी खात होते.चिरलेला कांदा,कोथिंबीर,त्या पाणीपुरीवर टाकून, खाणारे मस्तपैकी त्यांच्या जिभेचे चोचले पुरवत होते.कधी कुणीतरी गाडी थांबवून दहाची ,विसची आपल्या ऐपतीप्रमाणे खाऊन जात होते.मी मात्र निष्क्रिय होतो. माझ्या जिभेला पाणी सुटण्याऐवजी अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या.
आणखिनही बस काही आली नव्हती.मी मात्र तिच्यासाठी तडफडत होतो.मी ईकडेतिकडे पाहत उभा होतो.शून्यात नजर टाकून भोवतालचे सगळे विश्व नजरेत भरत होतो.
तितक्यात आवाज आला...
"ए रुबिना चल ना..!तुझे पाणी पुरी खाणी थी ना ...!!"
आवाजात गोडवा होता.एवढा गोडवा की साखरेतही कडवट पणा जाणवावा...!ती तिच्या मैत्रिणीला हाताने धरून पाणीपुरीच्या ढेल्याकडे ओढत होती.तिने स्कार्फ बांधला नव्हता.तिने नकाब घातला होता.डोक्यावरच्या केसांपासून ते पूर्ण मान नकाबने झाकून घेतली होती.गाल,नाक,हनुवटी,ओठ काही काही दिसत नव्हतं.मी मात्र चक्रावलो होतो.मला फक्त तिचे डोळे दिसत होते.तिच्या डोळ्यांच्या पापण्या मला खाली वर होताना दिसत होत्या.पापण्या बंद करताच तिच्या वरील गोरी गोरी लाल त्वचा दिसत होती.माझ्या मनात प्रश्न पडत होते,तिच्या पापण्या जर एवढ्या लाल आणि गोऱ्या असतील तर ते ओठ.....! कसे असतील ते..?लाल असतील....!की गुलाबाच्या पाकळ्या असतील.तिच्यावरही कधी दव म्हणून पाणी ठहरत असेल का..?त्या ओठांतही गोडवा असेल का ? ते गार गार असतील का ?आणि जर असतील तर त्यांचा गारवा कुणी अनुभवला असेल का..?तिचे डोळ्यांमुळे मी तिच्या ओठांची कल्पना करत होतो.आणि तिच्या ओठांचा गारवा मला भिजवत होता. मी पुरता तिच्या डोळ्यांत बुडालो होतो.मला उन्हाच्या लागत असलेल्या झळा कधी पावसाच्या सरीत बदलून गेल्या कळाळच नाही.तिच्या डोळ्यांच्या सागरात मी बुडून गेलो होतो.तिच्या पाणीदार बुबळात मी स्वतःला पाहत होतो.
पन मला तिचा चेहरा दिसत नव्हता.तिच्या मैत्रिणीला ओढत ती ढेल्यावर आली होती.तिची मैत्रिण पाणीपुरी खात होती.ती बाजूला उभी होती.योगायोगाने ती मला तिच्या डोक्यापासून ते पायापर्यंत दिसत होती.परंतु बुरख्यात..!मी तिला पाहण्याचा प्रयत्न करत होतो.ती पूर्ण बुरख्यात होती.पायातली चप्पलही मला दिसत नव्हती.तिचे पूर्ण गोरे आंग तिने काळ्या नकाबने झाकून घेतले होते.मी तिला पाहण्यासाठी मरत होतो.आणि माझ्या मनालाच खात होतो.तिच्या डोक्यावरचा केसही मला दिसत नव्हता.कशी असेल ती..?कशी दिसत असेल ती..?ती माझ्या कल्पनेतली असेल का..? ती तीच असेल का..? तीच असेल का ती,जिच्यावर मी जीव ओवाळून टाकन्याचे स्वप्न बघत असतो.
मला वाटत होतं की तिनेही पाणीपुरी खावी.त्या निमित्ताने का होईना पण ती तिचा चेहरा नकाबपासून मोकळा करेल.आणि मी ते लावण्य पाहू शकेल.पण ते शक्य नव्हतं.मैत्रिणीच्या लाख विनवण्याने सुद्धा ती काही तयार झाली नाही.आणि तिने काही तिचा चेहरा खोलला नाही.माझ्या मनात काही काही प्रश्न येत होते.मी तीच्याकडे पाहतोय हे तिला कळाले असेल का..?म्हणणूनच ती तिचा चेहरा मोकळा करत नसेल का..?अधून मधून ती माझ्यावर नजर टाकत होती.माझ्याकडे पाहत होती.
तितक्यात ती म्हणाली...!
ऐ रुबिना जल्दी कर ना..!वो देख अपनी बस आ गयी....!
ती डोळे विस्फारत रुबिनला म्हणाली.ती गडबड करू लागली.जागेवरच वळवळ करू लागली.पण रुबिनाचं काही केल्या आवरत नव्हतं.ती मस्तपैकी पाणीपुरी खात होती.
रुक ना "जहरा.."खाणे तो दें..!!
ती जहरा होती...!
"जहरा....!!"
तिचं नाव मला कळालं होतं...!नावानं मी स्तब्ध झालो.तिच्या नावाचा अर्थ होता गोरांगणा..!गोरी स्त्री..!खरंच कदाचित ती गोरीच असेल .म्हणूनच तिच्या जन्मदात्यांनी तीच नाव जहरा ठेवले होते.
रुबिनाने पाणी पुरी संपवली.तिने पैसे दिले.आणि गडबडीत त्या बसमध्ये जाण्यासाठी निघाल्या...त्या पळत होत्या.मला वाटत होतं की तिने जाताना एकदा तरी माझ्याकडे पाहावं.आणि तो नकाब खोलावा.मलाही तो चेहरा दाखवावा.ती रस्ता पार करत होती.
आणि तिने जाताना माझ्याकडे पाहिले.तिच्या डोळ्यात मला मलूलता दिसली.तिच्या डोळ्यांत मला प्रेमभाव दिसला कदाचित तिने, तिला पाहण्याची माझी धडपड ओळखली असावी.
तेवढ्यात......!!

कर्रर्रर्रर्र......!धाड.....!धाड......! आवाज आला.एक ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.ट्रकचा चुरा झाला.चालक स्टीयरींग वर रक्ताची लाळ गाळत निपचित पडला होता.मोठ्या ट्रकचा अपघात झाला.लोकांची गर्दी वाढली.
वाचवा...पळा.....!बाहेर काढा....!अंम्ब्युलन्स बोलवा... लोक आरोळ्या ठोकत होते.मीही पळालो.गर्दीतून पुढे गेलो.ते दृश्य पाहत होतो.आणि माझ्या छातीला पीळ बसला.कपाळाला घाम फुटला.सगळीकडे रक्त रक्त होते.मी माझी नजर फिरवली...!

आणि ट्रकच्या चाकाकडे मी पाहु लागलो.
जहराचा नकाब निघाला होता.तिचा चेहरा मला दिसत होता.ती नावाप्रमाणेच गोरी होती.फक्त आता तिच्या चेहऱ्यावर रक्ताचा थर साचला होता.ती निपचित पडली होती.आणि मी पाहिलेल्या पाणीदार डोळ्यात,कोपऱ्यात पाण्याऐवजी रक्त साचले होते...!रक्त साचले होते.....!!!!

प्रज्वल ढगे (प्रियानुज)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...