सदर
फिदी-फिदी-११
प्रज्वल ढगे (प्रियानुज)
दिनांक-१२/०६/२०१८
बुधवार
चोरा रे चोरा....!
(तुतारीचा निनाद आसमंतात घुमत आहे.ढोल ताशांचा आवाज आणि जय हो च्या जयघोषाने अक्खा रायगड किल्ला दुमदुमून निघाला आहे.गडावर बत्तीसमन सुवर्णसिंहासन दिमाखात उभं आहे.त्याचं उदघाटन म्हणून सर्व धारकरी जोमात आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र आणि उद्धव आलेले आहेत.)
देवेंद्र- आबाबा..केवढं मोठं हे सिंहासन......! (आपण झोपेत नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेत.)
उद्धव-बापरे काय म्हणताय..!तुम्हाला डाउट आहे का...?!आम्हीच वेडे आहो.असल्या शंकेखोर लोकांसोबत आम्ही युवती केली....!चुकलंच आमचं...! (वाघाचे पंजे मारत आहोत या अविर्भावात हात वर करत.)
देवेंद्र - आहो तसं नाही हो...! पण कसं शक्य झालं हे एवढं ......असं म्हणतोय मी....! (नेहमीप्रमाणे समजावून सांगतात त्याच ट्यून मध्ये)
उद्धवजी - कसं शक्य झालं म्हणून काय विचारताय....!आमचा कट्टर सपोर्ट होता गुरुजींना...!वेळोवेळी लिखित स्वरूपात लोकांशी 'सामना' करत आलोय आम्ही....! (आपल्या पेनित ताकद आहे.असं स्वतःच ठरवून)
देवेंद्र- तुम्ही काहीही करा....गुरुजी आमचेच आहेत हे विसरू नका....! (आपला संघी इतिहास आठवत)
उद्धव - गुरुजी तुमचे असले म्हणून काय झालं......विरोधाचा जाहीर सामना करायला हिम्मत लागते.....!वाघाचं काळीज लागतं.....! (भगव्या रंगाने स्वतःचं कपाळ रंगवत )
देवेंद्र - असं कसं..केला की आम्ही सपोर्ट....!आणि पुढेही करणारच...!शासनाकडून विशेष तरतूद करतोय आम्ही..!या सिंहासनाला कडी सुरक्षा देण्यासाठी......!हे विसरू नका...( छातीवर थापा मारीत )
उद्धव - तुम्हाला माहीत नाही वाटतं.... गुरुजी सरकारच्या वळचणीला बसत नाहीत म्हणून....!(जीभ दाताखाली चावत हसत हसत.)आमच्या सैनिकांसोबत धारकरी उभे करणार आहेत ते रायगडावर...! (आपल्या मावळ्यांकडे हात वर करून बघत)
देवेंद्र - हो का.....!ठीक आहे तर मग तुम्ही तलवारी घ्या...!आम्ही गुरुजींचे आंबे घेतो..!! (निवणूक जिंकल्या सारख्या आनंदात)
उद्धव - म्हणजे...? कोणते आंबे.....!? कसले आंबे...!? ( डोके खाजवत )
देवेंद्र - साहेब आम्ही सत्तेतील माणसं...!आम्ही जनतेच्या हितासाठी लढणारे...!गुरुजींनी जे वैभव उभे केलेय त्याची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे....! (साहेबांना लगेच सत्तेचा ढेकर आला )
उद्धव - आहो कोणती बाग...?काय बोलताय तुम्ही...! (वाघ चवताळुन अंगावर जातो.त्याच सेम पोजिशन मध्ये )
देवेंद्र - आहो साहेब..!हे गुरुजींचे आंबे आहेत...त्या आंब्यानी लोकांना मुलं होतात....!आणि लोकांची सेवा करणे हाच आमचा परमोधर्म....! (मनात शांती...शांती...शांती..... करत)
उद्धव - हो का...!एवढे भारी आंबे आहेत ते...? (आ करून )
देवेंद्र- कोण म्हणतं की आम्ही गुरुजींना समर्थन करत नाही म्हणून.....!आम्ही या आंब्यांच्या बागेला कुंपण करणार आहोत.सरकारी निधीतून...!विशेष संशोधकांसोबत करार करून या आंब्यांच्या नवीन प्रजाती निर्माण करणार आहोत आम्ही...!हे आंबे खाऊन झालेल्या मुलाने फक्त आमच्याच पक्षासाठी काम केलं पाहिजे असली प्रजाती निर्माण करणार आहोत आम्ही...!आंब्याची...! (आपल्या आगामी योजना उद्धवजी च्या कानात सांगत.)
उद्धव - म्हणजे घात...!!आमच्याशी दगा....!शत्रूचा पाठीवर वार....!असंच म्हणायचं का...!? (रागात )
देवेंद्र - हा...हा......हा.......साहेब तुम्ही द्या पहारा.....आम्ही आंबे बघतो.....! (चिडवत चिडवत)
उद्धव - नाही.....नाही.....जा रे ते आंब्याचं काय ते बघा.......!(राउतांना आदेश देत.)
देवेंद्र - आणि हो......लवकरात लवकर विकास जन्माला घालण्यासाठी विशेष आंब्यांची प्रजात जन्माला घालणार आहोत आम्ही....या गुरुजींच्या आंब्यांना सोबत घेऊन....! (गुदगुल्या झाल्यावर चुळबुळतात तसं चुळबुळत)
उद्धव - म्हणजे जनतेला मूर्ख बनवनार तुम्ही.....!म्हणजे पुन्हा घात... जनतेशी घात....!आम्ही असं होऊ देणार नाही......!
देवेंद्र - खरंच...!!करा मग काय करता येईल ते...!पण विकास जन्मणारच.....!आम्ही आमचा वादा पूर्ण करणारच...!आणि आंब्यांना संरक्षण मिळणारच....!तेही आमच्याच पक्षाचं.....!आमच्याच माणसांचं...... ( खुर्चीवर मागे रेल देत )
उद्धव - नाही..........$$$$....!चला रे मावळयांनो......!निघा.... ( नाक मुरडत साहेबांचा ताफा निघतो.मागे ढोल ताशांचा आवाज सुरूच आहे.)
उद्धव - मावळयांनो तयारीला लागा.....!पेनी मोडा....!तलवारी काढा..... कापा ते आंब्यांचे कुंपण.....!चोरा ते आंबे......!आणि दुष्मनांना नेस्तनाबूत करा.....! (साहेबांनी युद्ध छेडलं आणि सैनिकांना आदेश देत )
(सिंहासनाचे उदघाटन जोमात सुरू आहे.गुरुजी धारकऱ्यांसमोर भाषण देत आहेत.भगवे झेंडे फडफडत आहेत.उद्धवजी रागात रायगड उतरत आहेत.मोजीमेचे नियोजन करत आहेत.देवेंद्र मस्तपैकी पोटावरून हात फिरवत निवांत तो सोहळा पाहत आहेत.आणि उद्धवजींचे सैनिक त्यांच्या सेनापतीसमवेत रायगड उतरून आंब्याच्या बागेकडे धावत आहेत....)
ताजा कलम- या लिखाणाचा कुठल्याही राजकीय व्यक्तीशी किंवा प्रत्यक्षात राजकारणाशी,कुठलाही संबंध नाही.वरील व्यक्तिरेखा या काल्पनिक आहेत.याची नोंद घ्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा