बेवारस प्रेतांची माय-आशाबाई म्हस्के
स्टोरी- प्रियानुज (प्रज्वल ढगे)
ग्रामीण भागात कुणी मरण पावलं तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पूर्ण गाव गोळा झालेला असतो.मरण पावलेली व्यक्ति स्त्री असो वा पुरुष त्याचे अंत्यसंस्कार आजही पुरुषांच्या पुढाकारानेच होतात.गावाच्या वेशीपर्यंत स्त्री प्रेताला हवा घालत येते आणि तेथूनच ती वापस फिरते.प्रेताला अग्निडाग देताना तिला थांबू दिल्या जात नाही.आजही स्त्रीला अंत्यसंस्कार करण्याचा कुठलाही अधिकार नाही अशीच भावना समाजात आहे.या सर्व गोष्टीला वेशीवर टांगत औरंगाबाद शहरात राहणारी आशाबाई अंत्यसंस्कार करतेय.तेही बेवारस प्रेतांचा...!बेवारस प्रेतांची माय होऊन त्यांचा अंत्यसंस्कार करणाऱ्या या आशाबाईंची ही प्रेरणादायी कहाणी...!
"मुडद्यांना काय घाबरायचं,त्यांच्यात कुठं जीव असतो.त्यापेक्षा या जिवंत माणसांना घाबरलं पाहिजे."त्यांच्या डोळ्यांत मेलेल्या पार्थिवांविषयी कणव आणि जिवंत माणसांविषयी द्वेष तरळत होता.चौथी पास असलेल्या या आशाबाईंचं बोलणं एकूण मला माझं शिक्षण थिटं वाटलं.चार दिवसांच्या अथक शोधानंतर शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्यांचा मोबाईल नंबर मिळवला.या शेवटच्या प्रयत्नाने मला त्यांची भेट घालून दिलीच.
आशाबाईंचं पूर्ण नाव आशाबाई मिलिंद म्हस्के औरंगाबादेत जय भीम नगरात त्यांचं वास्तव्य.दोन वर्षांपूर्वी शासनाने दिलेल्या घरकुलात स्वतःचे थोडे पैसे घालून त्यांनी इमारतवजा घर बांधलं.यांना शहरात 'बेवारस प्रेतांची माय' म्हटलं जातं.शहराचे शासकीय रुग्णालय असो किंवा रेल्वेरुळावर अपघातात जीव गमावलेले प्रवासी असो. बेवारस म्हटल्या जाणाऱ्या प्रेतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी याच स्वीकारतात. २००७ सालापासून महिला बचत गटाद्वारे सुरू झालेले हे काम या क्षणालसुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने सुरू आहे.घरात काम करत असलेल्या आशाबाईंकडे त्यांच्याकडे त्यांचे पती मिलिंद म्हस्के आले.त्यांनी "मेलेल्या मढयांचा अंत्यसंस्कार करशील का?" विचारताच किळसवाणा चेहरा करत त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.बेवारस प्रेतांना पुरणं म्हणजे दुसऱ्यांचं दुःख स्वताच्या घरात आणने. अशी त्यांची मनोधारणा होती.पण 'जन्माला येऊन काहीतरी असामान्य गोष्ट करावी' या पतीच्या वाक्यांनी आशाबाईंना उद्युक्त केलं.त्यावेळच्या शहराच्या महापौर विजया रहाटकर आणि शहराचे पोलीस आयुक्त यांनी आशाबाईंचा 'इंटरव्ह्यू घेतला. प्रेतांच्या अंत्यसंस्कार प्रक्रियेच्या मुलाखतीत त्या पास झाल्या.बघता बघता पंचशील महिला बचत गटाने महापालिकेकडून बेवारस प्रेतांचा अंत्यसंस्कार करण्याचे टेंडर घेतले.आणि येथूनच सुरू झाले आशाबाईंचे असामान्य असे काम.ते काम म्हणजे शहरातील बेवारस प्रेतांचा अंत्यसंस्कार...!
त्यांच्याशी बोलताना आजही जीवनाचे काही पैलू कपटाने माखलेले असतात हे त्यांनि सांगितलेल्या काही घटनांनी लक्षात येत होतं.काळ लोटू लागला.यांच्या कामाची चर्चा राज्यभर पसरू लागली.जसं जसं राज्यातील माध्यमे त्यांची दखल घेऊ लागले तसं इकडे शहरातले काही राजकीय नेते आणि सामाजिक दुष्टांच्या मनात ही बाब खुपू लागली.शहरात महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या.आपला संभाव्य शत्रू भविष्यात फणा काढून उभा राहू नये म्हणून तेथील नगरसेवकांनी आशाबाईं विरोधात राजकारण सुरू केले.काही कळायच्या आत पंचशील महिला बचत गट आशाबाईंच्या विरोधात उभा टाकला.आशाबाईवर बचत गटाची रुग्णवाहिका स्वताच्या वयक्तिक कामासाठी वापरता असा आरोप झाला.आयुष्यात कधीही संबंध न आलेल्या शहरातल्या बायकांनी महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.एकीकडे यांच्याकडे घर बांधण्यासाठी पैसे कुठून आले याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचा ताफा मागे लावला.आशाबाईंचा वाईट काळ सुरू झालेला होता.पण त्या डगमगल्या नाहीत.पोलिसांच्या चौकशीला त्या मोठ्या हिमतीने सामोऱ्या गेल्या.शेवटी व्हायचे तेच झाले.पोलिसांच्या हाती काही लागले नाही.इकडे समाजकार्याची भूक त्यांना शांत बसू देत नव्हती. मासिक हप्त्याने स्वताची रुग्णवाहिका घेऊन त्या बेवारस प्रेतांना माय मातीच्या स्वाधीन करतच होत्या.
प्रत्येक प्रेताच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून जवळपास ३००० रुपये मिळतात.आपल्याकडे माणूस जन्मतो तो एखादी विशिष्ट जात आणि धर्म घेऊन.परंतु आशाबाईंकडे माणूस असतो तो निधर्मी.त्या प्रेतांचा अंत्यसंस्कार करताना कुठल्याही धर्माचा अंत्यसंस्कार विधी करत नाहीत.या बेवारस प्रेतांच्या अंगावर त्या नवा कपडा घालतात.अगरबत्तीच्या सुगंधात अग्निडाग न देता,त्या प्रेताला मातीत पुरतात.आज दीड वर्षे झाली आहेत.महापालिकेने त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिलेला नाही.स्वताच्या पैशांतून त्या आजही शासकीय रुग्णालयातुन रोज दोन-तीन प्रेतांचा ताबा घेतात. बेगमपुऱ्याच्या स्मशानभूमीत नेऊन त्यांचा अंत्यसंस्कार करतात.घेतलेल्या रुग्णवाहिकेच्या कर्जाचा हप्ता न फेडल्यामुळे महाराष्ट बँकेकडून त्यानां कालच नोटीस आली होती.आशाबाई बँकेची नोटीस दाखवत मला म्हणाल्या "मला लोकांनी कितीही त्रास दिला,तरी मी माझं काम करत राहते.देव माझ्यासोबत आहे.मला ज्या कामाला विरोध होतो ते काम माझे पूर्णत्वास जातेच.हे सारं ऐकून आणि पाहून मला त्यांच्या हिमतीचे कौतुक वाटत होते.त्यांच्या हिमतीचा परिपाक म्हणून की काय आतापर्यंत त्यांनी, महापालिकाआणि शहरातील पोलीस ठाण्याने बेवारस म्हणून घोषित केलेल्या २००० प्रेतांचा अंत्यसंस्कार केलेला आहे.ग्रामीण भागातल्या जवळपास तीन हजार प्रेतांना त्यांनी अनंतात विलीन केलेलं आहे.
आशाबाईंनी या दहा वर्षात अनेक कडू गोड प्रसंगांना तोंड दिलेलं आहे.या प्रसंगाची दाहकता विशद करताना त्यांनी काही घटना सांगितल्या.त्यातील एक प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता. विकृत मानसिकतेच्या नराधमाने एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता.तिच्या मऊ अंगावर चाकूने वार केलेले होते.पोट मांड्या रक्ताने माखलेले होते.अशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी महानगरपालिकेला मिळालेली होती.आशाबाईंना ही घटना कळाली.काही क्षणात त्या मुलीजवळ पोचल्या. मुलीला पाहून त्यांचंही मन हादरलं होतं.त्यांना या घटनेचं खूप वाईट वाटलं .जड अंतकरणाने त्यांनी त्या मुलीला स्वच्छ केलं.तिची वेणी घालून तिला गंध पावडर केलं.छान झगा घालून त्यांनी त्या मुलीचे अंत्यसंस्कार केले.हे सारं मी ऐकत होतो.माझ्या अंगावर शहारे येत होते.आशाबाईंचे डोळे पाणावलेले मला दिसत होते.त्या पाणावलेल्या डोळ्यांतून मला आशाबाईंच्या सामाजिक जबाबदारीचे असलेले भान दिसत होते.
पुण्यातून ट्रॅव्हल्समध्ये अवयवांचे तुकडे करून एका जेवणाच्या थाळीत पाठवलेल्या स्त्रीच्या अंत्यसंस्कारापासून ते एकदा पुरलेल्या प्रेतांना कायदेशीर चौकशीसाठी पुन्हा बाहेर काढण्यापर्यंतचे काम त्यांनी या दहा वर्षांच्या काळात केलेले आहे.आजही पालिकेने दिलेल्या ३००० रुपयांतून उरलेल्या पैशाने त्या समाजातील गरजूंना मदत करतात.अंत्यविधीसाठी पैसे नसलेल्या नातेवाईकांना त्या पैसे पुरवतात.एच आय व्ही एड्स झालेल्या एकोणीस वर्षाच्या मृत युवकाच्या अंत्यसंस्कारासाठी सोय नव्हती.युवकांच्या बहिणींनी केलेल्या विनंतीला (कारण ज्या मृत व्यक्तीचे नाव माहिती असते ती व्यसक्ती ही बेवारस नसते) मान देऊन त्यांनी त्या मुलाचे अंत्यसंस्कार केल्याचे त्या सांगतात.
माझ्याशी बोलताना त्यांच्या मनात कुठलाही मी पणा नव्हता.तांदूळ निसत त्या माझ्याशी अगदी सहजपणे बोलत होत्या.आजघडीला दहा वर्षांच्या या निस्वार्थ सेवेमुळे त्यांना शासनाकडून, अशासकीय संस्थांकडून, तसेच वेगवेगळ्या गटांकडून विविध पुरस्कार मिळालेले आहेत.मी बसलेल्या खोलीच्या चारही भिंती पुरस्कार आणि प्रमाणपत्रांनी भरलेल्या होत्या. पंकजा मुंडेसारख्या व्यक्तिमत्वाने आशाबाईंचा गौरव केलेला फोटो त्या खोलीत भिंतीवर लटकलेला पाहायला मिळतो.एकीकडे हा पुरस्काररुपी मिळालेला सन्मान आणि दुसऱ्यांबाजूने "मेलेल्या बेवारस मढयांना जाळून अपशकुन करणारी बाई" म्हणून मिळणारी उपेक्षा या समाजातील दोन टोकांना सांभाळत आजही आपल्या बेवारस लेकरांना आशाबाई अनंतात विलीन करत आहेत. आजही त्या 'त्या बेवारस प्रेतांची त्या आईच आहेत'.....
प्रियानुज (प्रज्वल ढगे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा