संघर्ष-प्रेम आणि जगण्याची एक धडपड....!
अण्णाभाऊंचे लिखाण प्रत्येक वेळी रंजल्या गांजलेल्यांना नायक बनवत आलेले आहे.त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत या मातीतील सामान्य माणूस झळकत असतो.त्यांनी या लोकांच्या समस्या आपल्या लिखाणात मांडून सगळ्यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यांच्या साहित्यकृतीतील अशीच एक कलाकृती म्हणजे "संघर्ष"ही कादंबरी.
नावातच या कादंबरीचे वेगळे पण जाणवते.काहीतरी मिळावे म्हणून या कादंबरीतील नायक/नायिका ही संघर्ष करत असावी अशी वाचकांची प्रातिनिधिक समजूत कादंबरीचे नाव वाचून होते.सुरुवातीचे दोन,तीन पान वाचून झाले की कळते , की ही कादंबरी आपल्याला काय सांगून जाणार आहे.ही कादंबरी स्त्रीप्रधान अशी आहे.अण्णांनी नायिका 'सुलभा' हिलाच समोर ठेऊन आपले लिखाण केलेले आहे.किंबहुना वाचक शेवटपर्यंत सुलभाचाच विचार करत राहतो.ही सुलभा आपले आयुष्य चांगले जगण्यासाठी किती खटाटोप करते आणि कोण कोणत्या परिस्थितींना तोंड देते हे वाचून वाचक बेचैन होऊन जातो.किंबहुना सुलभविषयी आत्मीयतेचि भावना निर्माण करण्यात अण्णा पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत.
संघर्ष ही एक प्रेमकथा असून या कथेचे नायक आनंद आणि नायिका वरती म्हटल्याप्रमाणे सुलभा ही आहे.ही कादंबरी कोसगाव या छोट्याश्या गावात रमते.कादंबरीच्या उत्तरार्धात नायक आणि नायिका आग्रा,सारंगपूर ते भारत पाकिस्तानच्या सीमेवरसुद्धा आपल्याला दिसतात.दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात.परंतु सूडबुद्धीने बेभान झालेले सुलभाचे वडील या दोघांच्या लग्नास नकार देतात.आणि सुलभाचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्याच मुलाशी लावले जाते.या लग्नानंतर तिच्यावर गुदरलेले प्रसंग अत्यंत क्लेशदाय वाटतात.लग्नानंतर तिची झालेली हेळसांड.त्यात आनंदात तिचा गुंतलेला जीव.झालेल्या मुलामुळे (सुरेश)आईच्या बंधनात अडकलेली सुलभा मनात काहूर उठवते.एका स्त्रीची होत असलेली कुचंबणा,नवऱ्याकडून दुजाभाव,नवऱ्याचा रंगेलबाजपणा यांना ती कशाप्रकारे सामोरे जाते हे वाचण्यासारखे आहे.
आनंदा आणि सुलभा आपापले आयुष्य जगत असतात.परुंतु नियतीने त्यांना जवळ आणणे.सर्व योगायोग जुळून आणणे अण्णांनी चांगलेच साधलेले आहे.त्यांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन कादंबरीच्या उत्तरार्धात घडते.वेगवेगळ्या धाग्यांना घेऊन ही कादंबरी एक परिपूर्ण कथा बनवण्यात आलेली आहे.वाचताना वाचकांच्या डोळ्यासमोर सगळे चित्र उभे राहतात.पूर्ण कादंबरीत अण्णांनी पत्रांचा पुरेपूर उपयोग केलेला आहे.त्यामुळे प्रेमास प्रेमपत्रांची साथ लाभल्यामुळे वाचकांच्या मनातील प्रेमभावना सहाजिकच फुलून येते.कथेतील चित्रवर्णन,व्यक्तीवर्णन,प्रसंगांचे वर्णन,भोवतालचा परिसर अण्णा आपल्या लेखणीतून जिवंत उभे करतात.रात्रीचे प्रसंग चितारताना प्रसंगानुरूप केलेले वर्णन कधी अंगात गुलाबी थंडी बभरवतं, तर कधी अंगावर शहारे आणतं. सुलभाची आयुष्याशी झटापट सांगत असताना कथेत शेवटी आल्हादायीपणा येतो.वातावरण मलुल होते आणि नक्कीच पुढे शेवट गोड होईल ही आशा मनात जन्म घेते.झालेला शेवट,युद्धभूमीवरचे प्रसंग मनाला चटका लावतात.सुलभाने आपल्या आनंदासाठी केलेला आक्रोश वाचून मनात भडभडायला येते.अण्णांनी आपल्या कथेत उर्दू कवी इकबाल सुद्धा घेतला आहे.इकबालच्या काही ओळी तसेच रणभूमीवरचे प्रसंग जिवंत साकारण्यासाठी आपल्यातल्या कवीची मदत अण्णांनी घेतलेली आहे.त्यांनी लिहिलेल्या काही ओळी...
हृदयात तेवती देशभक्तीची ज्योती
आंन बहुत स्फुरली महाकाळाची शक्ती
शब्दांनी भिडवली तोफखान्याला बत्ती
बेबंद जाहले धुंद रणावर गर्दी
त्या ठाऊक होते स्वातंत्र्यासाठी लढणे
त्या ठाऊक होते स्वातंत्र्यासाठी मरणे
नवऱ्याच्या रंगेलबाजपणा मुळे सुलभा त्याच्याशी फारकत घेते.परंतु नंतर तिचे काय होते?तिला आनंद भेटतो का?आनंद तिला स्विकारतो का ? हे जाणून घेण्यासाठी वाचक ही कादंबरी वाचतच जातो.आणि मनोमनी या दोघांचे मिलन व्हावे ही आशा नक्कीच बाळगू लागतो.लष्करात कॅप्टन झालेला आनंदा खरंच तिला स्विकारतो का ?मृत्यूच्या दाढेत गेलेला आनंद पुन्हा जिवंत होतो का ? अशी अनेक प्रकारचे प्रश्न वाचकांच्या मनात येतात. आपण आपापले कयास लावत जातो आणि नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आतूर होतो.
पूर्वार्धात थोडीशी कंटाळवाणी वाटणारी ही कादंबरी नंतर मात्र वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालेली आहे.ही कादंबरी अपल्याला अण्णांच्या कल्पनाशक्तीची जाणही करून देते.प्रेमरसिक आणि वाचन प्रेमींनी ही कादंबरी खास करून वाचावी अशीच आहे
प्रकार-कादंबरी
नाव-संघर्ष
लेखक-अण्णाभाऊ साठे
प्रकाशन-अक्षय प्रकाशन
किंमत-१८० ₹
प्रज्वल ढगे (प्रियानुज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा