शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

विकास.....!विकास........!विकास.......!

सदर-फिदी-फिदी
क्रमांक-१०
प्रज्वल ढगे (प्रियानुज)

विकास.....!विकास........!विकास.......!

(आज फिदुमामा जरा जास्तच आनंदात होता.डोक्यावर मोदी चं नाव असलेली टोपी,गळ्यात कमळाचा फोटो असलेला गमछा,नवा सदरा घालून तो निघाला होता.आपले परम मित्र ताज महल (ता.म.) आणि लाल किल्ला (ला.की.) यांना भेटायला चालला होता.तसं ते नेहमीच भेटत असतात त्यांची भेट आज इंडिया गेटच्या चबुतऱ्यावर ठरली होती.ताज महालही आला होता भेटीला.तिघेही बसले आणि बोलणं सुरू झालं.)

ता.म.- काय म्हणतोयस फिदुमामा....!(खुल्या आवाजात)

फिदुमामा- काही नाही झक्कास....! (खुलून)
काय झालं रे या लाल किल्ल्याला असा का बसलाय ह्यो..मान टाकून....! (प्रश्नार्थक नजरेने ताज
महलला विचारत)

ता.म.- दुःखी आहे तो....!(कमी आवाजात)

फिदुमामा- आरे ये लेका काय झालं....!? (लाल किल्ल्यास विचारणिच्या सुरात)

ला.की.- काय केलं रे तुझ्या मोदी साहेबांनी माझं....? (रडकुंडीला येऊन)

फिदुमामा- काय केलं म्हंजी....? किती महाग इकला गेला बे तू...!असा काय रडतुयास.....!

ला.की.- मग काय करू..?

फिदुमामा- अरे लेका...तू तर आनंद साजरा करायला पाह्यजीस...! तुह्ये "अच्छे दिन" येणार हाईत..!

(अच्छे दिन म्हटलं की ताज महाल आणि लाल किल्ला यांना मळमळायला लागलं.परंतु त्यांनी मळमळ तशीच दाबली)

ता.म.- आरे ...आम्हाला असले "अच्छे दिन" नको होते रे...!

फिदुमामा- मंग कशे पाहिजी व्हते.....? (डोळे मोठाले करून)

ला.की.- आम्हाला भारत मातेच्या कुशीतच मरायचं होतं रे.....! कुणाचं गुलाम व्हायचं नव्हतं ......! (हताश
होऊन)

फिदुमामा- ते काय नाय आम्ही जिथं मर म्हनलं तिथं मरायचं आण जिथं जग म्हनलं तिथंच जगायचं..!...समजलं
का...?

ता.म.- असं का बरं...? (आपल्या घुमटाला खाजवत)

फिदुमामा- का म्हंजी....! आता आमची सत्ता हाय...!

ला.की.- आरे आमचं आमच्या मातेवर प्रेम आहे.आम्हाला स्वातंत्र्य आवडतं....! (समुजतदार पणे)

फिदुमामा- आहे नं पिरेम....! मंग तुम्ही आमच्यावर नाराज कसे काय व्हवू शकता....!आम्ही बी आमच्या
भारतमातेच्या सेवेसाठीच तुम्हाला ईकल हाई....!(आपली देशभक्ती जागवीत)

ता.म.- आरे आम्ही काय तुला कमी पैसे पुरवितो....! किती टुरिस्ट येतात आम्हाला पाहायला....!तुम्हाला पैसा
मिळतोच की..!

फिदुमामा- नाय ...नाय.त्यो पैशाचा सवालच नाय....! (हातावर थाप मारीत)

ला.की.- मग....? (डोळे मिचकवीत)

फिदुमामा - समद्यायचा ईकास झाला पाइजे....! आम्ही फकस्त इकासाची बात करतो...! (आपली डोक्यावरची टोपी
सावरत)

ला.की.- मग आम्हाला विकून कसला रे विकास....? (थोडं दम देऊन)

ता.म.- यातून काय भेटणार रे तुम्हाला...?(लाल किल्ल्याला दुजोरा देत)

फिदुमामा- काय सादनार मंजि....? समद्यायचा इकास होणार....! (मोकळा श्वास देत)

ला.की.-हुंमम कूछ तो दाल में काला है...! (भुवया उडवत)

फिदुमामा- नही रे भो....!दाल में काला नहीं रे...."दालमिया है वो...! त्यालाच इकला तुम्हाला(समजावणीच्या सुरात)

ला.की.- काय फायदा रे आम्हाला विकून.....? (जाब विचारत)

फिदुमामा- आम्ही गरीबायची बी काळजी घेतो....!आन शिरमंतायची बी.....!त्यायची काळजी नगं का घ्यायला....!
(कमळ असलेला शेला सावरत)

ता.म.- अरे ते आधीच धनाढ्य आहेत.त्यांची काय काळजी घेणार ....? (उत्सुकतेने)

फिदुमामा- ते काय नाय सांगायच...!परत्येकाला इसकिमीचा फायदा झालाच पायजे...! (मान डुलवत)
ईकास म्हंजी ईकास.....!

ता.म.- अरे पण....?(समजावून सांगत असतो.पण मध्येच फिदुमामा त्याला रोखतो)

फिदुमामा- बस्ससस....!लय झालं आता...!ताजमहल आता तू बी तयार ऱ्हायचं...!तुलाबी आम्ही ईकणार हायत
चूळ बुळ करायची नाय....! (दटाऊन)

ता.म.-आरे पण मी तर प्रेमाचं प्रतीक आहे रे..!(रोमँटिक होऊन)

फिदुमामा - आम्ही काय तुह्ये दुसमाण हाय का रे....! (मांडीवर हात ठेवून)

ला.की.- तस नाही रे........पण तुझे पंतप्रधान ....(बोलत असतो पण मध्येचा फिदुमामा बोलतो.)

फिदुमामा- तुझे नाही आपले म्हणायचं.....!(डोक्यावरची मोदींची टोपी सरळ करीत)

ला.की.- हो...हो....बरं ते आपले पंतप्रधान स्वतंत्रदिनी माझ्यावरूनच भाषण देत असतात...मग कुठे जाणार ते....?
(बाजी मारली या अविर्भावात)

फिदुमामा- कसं व्हनार म्हंजी...!!आम्ही बी भाडं देऊ.सोतंत्र दिसी...! (दातातील काडी काढत)

आता आम्हीसगळं काही ईकणार....!!(टाळ्या वाजवत)

ता.म.- मग काय होणार......! (प्रधानार्थक नजरेने)

फिदुमामा- अरे ..मग......ईकास व्हनार.... ईकास....!
सगळे लाभार्थी व्हनार.....!
सगळ्यायचा ईकास व्हनार.....!
अच्छे दिन येणार.......! (म्हणत फिदुमामा रस्त्याने घराकडे ओरडत पळत सुटतो)

(इकडे आपण विकले जाणार म्हणून ताज महाल रडत बसलं आहे.तो निस्तेज होऊन बसला आहे.लाल किल्ल्याने डोळे झाकले आहेत.तिकडून दालमिया वॉटर सप्लायर पाण्याचे जार घेऊन येत आहे.रस्त्याने "धिस प्रॉपर्टी इस बिलॉग टू दालमिया ग्रुप" च्या पाट्या रोवल्या जात आहेत.)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...