सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...




                  मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध्यक्षांना पत्र पाठवून त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे एकाअर्थी अभिनंदनीयच आहे. पक्षांतर्गत लोकशाहीला बळकट करण्यासाठी उचलेल्या या पत्रपावलाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहीजे. आमच्याकडे विविध पदनियुक्त्यांसाठी निवडपद्धती ही ‘शतप्रतिशत लोकशाही’ पद्धतीची असते, असं प्रत्येक पक्षाकडून छातीठोकपणे सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांची अंतर्गत परिस्थिती कशी आहे हे आपण जाणतोच.

                    आजच्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत जो काही गोंधळ झाला तो एकाअर्थी स्वागतार्हच आहे. राहूल गांधींनी पत्र लिहणाऱ्या 23 जणांवर भाजपसोबत मिलीभगत असल्याचा आरोप केल्यानंतर माजलेला हाहा:कार आणि राहूल गांधी यांना झालेला विरोध हा काँग्रेसमध्ये लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. ज्या पक्षात विरोधी मत मांडायला जागा असते, तो पक्ष लोकशाहीत नेहमीच सुदृढ असतो. राहूल यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यावर आरोप करावे आणि बैठकीतच थेट ट्विट करून सिब्बल यांनी राहुल यांच्या वक्तव्याचा समाचार घ्यावा ही काही लहान गोष्ट नाही. बैठक चालू असतानाच पक्षाच्या पूर्वाध्यक्षांच्या वक्तव्याला समाजमाध्यमांवर सार्वजनिक स्वरूपात उघडपणे विरोध करायलाही धमक लागते. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्या प्रखर विरोधानंतर राहुल गांधी यांना माघार घ्यावी लागली. आपण असं काहीही बोललो नाहीत असंही स्पष्टीकरण राहुल यांना द्यावं लागलं. काँग्रेसच्या बैठकीत आज घडलेल्या घटना खूप काही सांगून जातात. काँग्रेसमध्ये अजूनही विरोधी मताचा सन्मान केला जातो. काँग्रेसमध्ये व्यक्तीकडे असलेल्या अधिकारांचा अमर्याद वापर केला जात नाही असाही संदेश एकाअर्थी आज काँग्रेसने भारतीय जनतेला दिला आहे. 
 
        आता कल्पना करुया की काँग्रेसच्या बैठकीत झालेला हाच गोंधळ भाजप पक्षात झाला असता तर? किंवा अशाच स्वरूपाचा गोंधळ भाजपमध्ये होणे शक्य आहे का? देशाची सत्ता हातात असलेल्या भाजप पक्षाची सत्ता मोदी-शाहा या जोडगोळीकडे आहे. मोदी-शाहांच्या भाजपमध्ये खंडनमंडणाचे प्रकार घडल्याचे अजूनतरी ऐकीवात नाही. अमित शाहा, नरेंद्र मोदी यांच्या मर्जीविरुद्धच्या कामाला भाजपमध्ये परवानगी नाही. कुणी असा प्रयत्न केलाच तर संबंधित पामराचा कार्यभाग बुडालाच म्हणून समजा. मोदी-शाहा म्हणतील तीच पूर्व दिशा अशी परिस्थिती सध्या भाजप पक्षात आहे. पक्षात हुकुमशाही कारभार असणे हे कधीही घातकच. पक्षातील हुकुमशाहीमुळे देशाची दुहेरी हानी होते. एक तर पक्षांतर्गत लोकशाही नसल्याने समजातील प्रत्येक स्तरातील नेतृत्वाला संधी मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मर्जितल्या माणसांना पोसल्याने देशाबरोबरोच पक्षाचाही विकास, विस्तार, आणि व्यापकता खुंटते. परिणामी पक्ष कुजण्यास सुरूवात होते. हुकुमशाही कारभारामुळे पक्षाची दीर्घकालीन हानी होणे अटळ असते. भाजप पक्ष सध्यातरी ऐन बहरात आहे. त्याच्या भक्कमतेस सध्यातरी कुठलीही हानी नसल्याचं दिसतं. सद्यस्थितीला काँग्रेसला झालेला मुडदुस हे पक्षांतर्गत हुकुमशाहीचंच फळ आहे.  तर सध्याचा भाजप पक्षाचा एकाधिकारशाहीग्रस्त वर्तमान, भाजपचा भाविष्यकाळ  वाळवीग्रस्त असण्याचा पूर्वसंकेत आहे. 
      आता मुद्दा गांधी कुटुंबावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांचा. तर आजच्या बैठकीतला गोंधळ काँग्रेसच्या गरूडभरारीचे प्राथमिक लक्षण का समजू नये..?

प्रज्वल राजाभाऊ ढगे. (पत्रकार)
मो.-9923959974, 8999468742
Mail- prajwaldhage98@gmail.com
24 ऑगस्ट 2020

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

रात अकेली है- मर्डर मिस्ट्रीची संथ कहानी...

रात अकेली है- मर्डर मिस्ट्रीची संथ कहानी...

          मर्डर मिस्ट्रीला केंद्रस्थानी ठेवून आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले. गूढ आणि रहस्यमयी कथानक असलेल्या काही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली. तर कथानक डावं, किंवा दिग्दर्शकाला कथेला न्याय देता न आल्याने काही चित्रपट आपटल्याचे आपण पाहिलेलं आहे. कोरोना महामारीच्या या काळात ओटीटी मंचावर वेबसिरिजबरोबरच चित्रपटांचेही प्रदर्शन सुरू झाल्याने इथेही भयकथा (हॉरर), गूढ (मिस्ट्री), रहस्य (सस्पेन्स) अशा आशयाच्या चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली आहे. नेटफ्लिक्सवर 31 जुलैला प्रदर्शित झालेला, नवाजुद्दीन सिद्दिकीची मुख्य भूमिका असलेला रात अकेली है हा चित्रपटही अशातलाच एक.
         चित्रपटाच्या सुरुवातीलाच रघुवीरची पत्नी आणि वाहन चालकाचा खून होऊन पुढल्याच क्षणी चित्रपट थेट पाच वर्षे पुढे जातो. पुढच्या काही मिनिटांत पिढीजात धनाढ्य असलेल्या रघुवीर सिंहचा त्याच्या लग्नाच्या दिवसशी खून होतो. बालपणी झालेला अत्याचार आणि दोन वेळा करावं लागलेलं अबॉर्शन असह्य झाल्याने सज्ञान वसुधा (शिवानी रघुवंशी) रघुवीरचा खून करते. अर्थात गूढकथा असल्यामुळे या खुनाची उकल सर्वात शेवटी होते. आपल्या भाचीवर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या रघुवीर सिंहच्या (खालीद तैबजी) खुनाची उकल, खऱ्या मारेकऱ्याचा शोध, हेच चित्रपटाचे कथानक आहे. रघुवीरचा खून कुणी केला? राधा (राधिका आपटे) खुनासाठी खरंच जबाबदार आहे का? नोकर चुन्नीला खुनासंदर्भातले नेमके कोणते गुपितं माहिती आहेत? या प्रश्नांची उत्तरं तसेच बालवयातील वसुधावरील अत्याचार, वसुधाने घेतलेला सूड, वसुधाला वाचवण्यासाठी जटिलने लढवलेली शक्कल चित्रपटात प्रत्यक्षपणे पाहणेच इष्ट आहे. 
       चित्रपटातील मुख्य पात्र जटिल यादव (नवाजुद्दीन सिद्दिकी) पोलीस आहे. चित्रपटात खुनाच्या तपासाचे काम आपल्याकडे आल्याने जटील तपसाचे काम पूर्ण ताकदीनीशी करतोय. तद्दन चित्रपटांत नायक जसा निडर, धैर्यशिल असतो; अगदी तशाच प्रकारे जटिलसुद्धा धाडसी आहे. जटिल राजकीय व्यक्ती, वरिष्ठांचा दबाव झुगारून आपल्या कर्तव्याला प्राणपणाने जोपासनारा पोलीस आहे. एकीकडे खुनाचा तपास आणि दुसरीकडे चांगला जोडीदार मिळावा म्हणून रघुवीर सिंहच्या खुनाच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या राधाला (राधिका आपटे) आपलं करण्यासाठी जटिलची तळमळ चित्रपटात पाहण्यासारखी आहे. तपासाच्या धांदलीत जटिल-राधाची वाढत जाणारी जवळिक, त्यांचं फुलत जाणारं प्रेम चित्रपटात प्रत्यक्षात पाहणंच आनंददायी आहे.
       राधाचं भावविश्व चित्रपटाच्या आशयचौकटींना छेद देतं. राधा खून झालेल्या रघुवीरची दुसरी पत्नी आहे. वडिलांनीच विकल्यामुळे स्वता:च्या कोशात दु:खी, कष्टी होऊन जगणं राधाला सोयीचं वाटतं. त्यातच प्रियकर विक्रम सिंगकडून (रघुवीर सिंहचा भाचा) झालेल्या उपहासामुळे राधाचं अधिकच खच्चिकरण झालेलं दिसतं. इच्छेविरुद्ध होणारं लग्न, आणि लग्नाच्या दिवशीच पतीचा झालेला खून यामुळे राधा अधिकच एकलकोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्या सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या अवहेलनेमुळे राधाला आपलं हक्काचं असं कुणीतरी हवं आहे. आपल्या म्हणवणाऱ्या माणसाच्या शोधात असतानाच राधाच्या आयुष्यात जटिल येतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात जटिलच्या येण्यानं राधा काहीशा प्रमाणात सुखावलेली पाहायला मिळते. कथानकात जटिल आणि राधाचं प्रेम रघुवीरच्या खुनाच्या तपास प्रक्रियेत समांतरपणे फुलत जातं. पुरूषी अहंकारी मानसिकतेतून राधावर झालेले अन्वनित अत्याचार, समाजाकडून होत असलेली अवहेलना हे सारं काही पचवणारी राधा निधड्या छातीची महिला आहे. समाजिक दृष्टीकोनातून राधा चारित्र्यहीन असली तरी स्व:तचा आत्मा शुद्ध, आणि पवित्र ठेवणारी राधा प्रेक्षकांच्या मनात स्वता:साठी सद्भावना, आणि आदर पेरून जाते. त्यापेक्षाही राधाचे असलेले विवाहबाह्य संबंध माहित असूनही जटिलचा राधावर जडलेला जीव आपल्याला अधिक सुखकारक वाटतो. जटिलची आधूनिक विचारांशी असलेली जवळिक आपल्याला विचार करायला लावते.
       नवाजूद्दीनने जिवंतपणा आणण्यासाठी भूमिकेत जीव ओतलेला आहे. राधिका आपटेचाही तेवढाच कसदार अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. राधा आणि जटिल चित्रपटाचे मुख्य पात्र असले तरी, चित्रपटात इतर किरदारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. किंबहूना इतर पात्रांच्या असण्याशिवाय कथा पूर्ण होऊ शकलीही नसती. खुनाची उकल झाल्यानंतर प्रत्येक पात्र किती महत्त्वाचे होते हे चित्रपटाच्या शेवटी कळते. वसुधाने रघुवीरचा खून केल्यानंतर सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करणारी वसुधाची आई प्रमिलाही (पद्मावती राव) चित्रपटात तेवढीच महत्त्वाची आहे. घरातली नौकर चुन्नी (रिया शुक्ला), विक्रम सिंग (निशांत दहीया), एमएलए मुन्ना राजा (आदित्य श्रीवास्तव) यांच्या असण्यालाही तेवढंच वजन आहे. रिया शुक्ला, निशांत दहीया, आदित्य श्रीवास्तव यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिेला आहे. दिग्दर्शक हॉनी त्रेहानने प्रत्येक क्षण चाणाक्षपणे एकमेकांत विणलेले पाहायला मिळतात. चित्रपटात छोट्या-छोट्या गोष्टींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एकमेकांशी संबंध आहे. एखादी गोष्ट पाहायची राहून गेली तर चित्रपटाची उकल न होण्याचा धोका अधिक संभवतो. प्रसंग अतिरिक्त जरी नसले तरी दीड तासांच्या ‘फास्ट चित्रपटाच्या’ काळात, अडीच तासांचा हा चित्रपट काहीशा प्रमाणात रटाळ आणि लांब वाटतो. चित्रपटाची वाढलेली लांबी कथेची गरज आहे हे मान्य जरी केलं, तरी कथानक अगदी संथगतीने समोर जात असल्यामुळे चित्रपट कधी संपेल असंही कधीकधी वटून जातं. सहनशीलता, आणि कुठलेही थ्रील नसलेले चित्रपट पाहण्याची सवय नसलेल्या प्रेक्षकांना रात अकेली है हा चित्रपट अगदीच रसहीन वाटू शकतो. उत्तर प्रदेशातील संस्कृती, राहणीमान, बोलीभाषा अशा साऱ्या गोष्टींवर दिग्दर्शकानं मोठं काम केल्याचं चित्रपट पाहिल्यानंतर कळतं. रात्रीचे दृश्य जास्त प्रमाणात असल्याने चित्रपटातील वातावरण भकास वाटते. त्यात एकही गीत नसल्यामुळे भकासपणात आणखी भर पडते. एकुणात रटाळ, रसहीन वाटत असला तरी ‘रात अकेली है’ हा चित्रपट एकदा पाहण्यास हरकत नसावी.
 
चित्रपट- रात अकेली है 
रेटिंग-⭐⭐⭐ 
दिग्दर्शन- हॉनी त्रेहान
संवाद, कथा, पटकथा-  स्मीता सिंग 
कलाकार- नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, निशांत दहीया, शिवानी रघूवंशी, तिग्मांशू धुलीया, आदित्य श्रीवास्तव, श्वेता त्रिपाठी


प्रज्वल ढगे
9923959974
prajwaldhage98@gmail.com

मंगळवार, ३ मार्च, २०२०

फिदीफिदी-15 नका सोडून जाऊ रंग महाल..!

प्रति,
प्राणप्रिय, विकास पुरुष, देवाधीदेव, जगज्जेते आदरणीय मा. ना. मोदीजी साहेब...
                 

                पत्रास कारण की, जगभरातल्या अफवांनी डोक्याचा चुरा चुरा केला होता. तुमच्या ट्विटने अनेकांना कोड्यात पाडलं होतं. परंतु तुमच्या ‘लेटेस्ट ट्विट’मुळे कोड्याची उकल  आपसूकच झाल्याने सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या...तुम्ही सोडून जाता की काय असं वाटत असताना तसं काही होणार नाही हे कळल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय.  त्यामुळेच वाटलं की करावा तुमच्याशी वार्तालाप. आणि म्हणूणच हा सारा खटाटोप...तर साहेब...

               एखद्यानं तुमच्यावर अभ्यास करायचा म्हटलं तर खूप अवघड आहे. साहेब तुम्हाला समजून घ्यायचं म्हटलं तर आख्खं आयुष्य जाईल. अहो  मी तर म्हणतो की,  तुम्हाचा सेन्स ऑफ ह्यूमर समजून घ्यायचा म्हटलं तर सात नव्हे सातशे जन्म घ्यावे लागतील. अहो, काय ती तुमची अफाट विद्वत्ता..!  किती खोल... खोल.. विचार करता हो तुम्ही.! आम्ही विचार करत होतो 'नो मोदी नो ट्विटर'चा, अन तुमचा विचार 'शी इन्सपायर अस'चा. मानलं साहेब तुम्हाला यु इन्सपायर अस..!
           सुरुवातीला तर आमच्या पायाखालून जमीन सरकली हो. काय ते तुमचं ट्विट. पाया खालून जमीन सरकणे म्हणजे काय असतं हे तुमचं ट्विट वाचून अनुभवलं. मोदीजी अशी टिंगल आमच्या सारख्या पामरांची करत जाऊ नका. काल रात्रभर माझ्या नयनांमधून अश्रूंचे पाट वाहू लागले. काल रात्रभर झोप नाही लागली आहेब. तुम्ही ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर होते म्हणून मीही या महाजालात आलो. तुमच्या पोस्ट पाहूनच मी कायम प्रेरित व्हायचो. तुमच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीला हार्ट दिल्याशिवाय सकाळजी न्याहारी करत नव्हतो मी साहेब. आणि हो.. आताही करत नाही...!
          साहेब एक काळ होता. ऐन तारुण्यात नोकरीसाठी पेपरात जाहिराती चाळणं झालं की ‘शिला की जवानी’ पाहत बसण्यात वेळ जायचा. पण साहेब तुमच्या येण्याणं सारं जीवन पालटलं. आत मी पारावर बसून गाणे पाहत बसण्यापेक्षा विधायक कामं करतो. साहेब आता मी तुमचे ट्विट, तुमच्या पोस्ट माझ्या व्हाट्सअॅपवर ग्रुपवर शेअर करतो..! आयुष्यात समाधानी असणं महत्त्वाचं आहे. तुमची पोस्ट शेअर केली की कित्येक लाईक, कमेन्ट्स, आणि शेअर्स मिळतात हो मला... अजून काय पाहिजे आयुष्यात... पेपरात नौकरीची जाहिरात चाळून चाळून थकल्यावर, मोदी साहेब लवकरच दोन करोड रोजगार निर्माण करणार असल्याच्या पोस्ट मी 2014 पासून लाईक, शेयर करत आलोय. कदाचित स्वर्ग म्हणजे काय तो हाच असावा साहेब...
                    साहेब तुम्हाला कायम फॉल्लो करणारे माझ्यासारखेच असे कित्येक 'उद्यमी' आहेत या भारतात. कित्येकांना तुम्ही हा लाईक शेअर करण्याचा 'रोजगार'ही दिला आहे म्हणे. साहेब मिही त्याचा थोडा थोडा लाभार्थी आहे.    माझं जाऊद्या साहेब...! तुम्ही जर सोशल मीडियावरचे मिस्टर इंडिया झाले तर माझ्यासरख्या अनेकांचं कसं व्हायचं? असा विचार जरी आला तरी पोटात कालवायला लागलं होतं हो.!
              पण साहेब आम्ही काय शांत बसणाऱ्यांमधले नाही आहोत. तुम्हीच नाहीत म्हटल्यावर आम्ही तरी सोशल मीडियावर राहण्यात काय अर्थ? तुमच्या शिवाय आमचं अस्तित्व काय सांगा बरं? म्हणूनच आम्ही ठरवलं, आम्ही मुद्दामहून #IWillAlsoLeaveTwitter असा हॅशटॅग ट्रेन्ड केला.. एवढंच नाही साहेब तुम्ही नाही म्हटल्यावर आम्हाला ट्विटर पण नकोय.. माझ्यासारख्याच काही फॅन्सने #NoModiNoTwitter चा शोध लावला...! साहेब आयुष्यात कधी काय होईल काही सांगता नाही येत. एखादा छोटासा निर्णयही आयुष्याला मोठं वळण देणारा ठरू शकतो. तुमचा सन्यासाचा निर्णय म्हणजे धक्काच होता हो आमच्यासाठी. तुम्ही सन्यास घेत आहात म्हणून फडणवीस मॅडमपण सोशल मीडियावरून सन्यास घेण्याच्या मार्गावर होत्या म्हणे. आपल्या नेत्याला डायरेक्ट फॉल्लो करण्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे..? साहेब तुम्हाला आमची चिंता आहे हे सिद्ध केलंत तुम्ही. तुम्ही खरंच विश्वनेते आहात. तुमचं दुसरं ट्विट आलं आणि थोडं हायसं वाटल. तुम्ही सोशल मीडिया सोडणार नाहीत हे कळल्यानंतरच भाकरीचा तुकडा पोटात टाकला साहेब... साहेब खरंच तुम्ही महान आहात.... साहेब तुमच्या शिवाय आयुष्यात काही काही नाही... काल रात्रभर सगळं कसं शून्य-शून्य वाटत होतं हो. 
   रात्रभर विचार करत होतो की साहेबांचा मुखभंग एवढ्या लवकर झालाच कसा..? असं वाटायला लागलं की तुम्ही आता थकले. उद्विग्न झाले...या जल्पकांच्या टोळ्यांनी तुम्हाला हैराण केलं. तुम्हाला हे सोशल मीडियाचं आभासी आयुष्य नकोय... पण साहेब तुमचं ट्विट पुन्हा आलं...तुम्ही पुन्हा आलात...साहेब या जल्पकांना तुम्ही घाबरत जाऊ नका हो.. आम्ही आहोत की त्यांना सुतासारखं सरळ करायला..! तुम्ही बिनधास्त ट्विट करत जा हो..! जल्पकांचं कामच आहे ते..! आता हेच बघाना राहुल साहेबांनी तुम्हाला टोला मारला म्हणे..! म्हणाले की सोशल मीडिया नव्हे तर द्वेष सोडा..! पडले की तोंडावर..! आणि ते पडले जरी नसते तर आम्ही होतोच की त्यांच्यासोबत कुस्ती खेळायला...!
       जाऊद्या साहेब आम्हाला विश्वास होता तुम्ही एवढ्या सहजासहजी रंगमहाल सोडून जाणार नाहीत..! आम्हाला पक्कं वाटलं होतं की असं अचानक सोडून जाणार नाहीत. तुमची ही शंभर टक्के गुगली असणार. तुम्ही नोटबंदीसारखा यावेळीही काहीतरी मोठा धमाका करणार. क्षणासाठी असं वाटलं होतं की, यावेळी देशभक्तीचं काहीतरी मोठं सत्कार्य आमच्या हातून घडणार आहे. नोटबंदीच्या वेळी रांगेत उभं राहून देशभक्ती सिद्ध करण्याचं आवाहन आम्ही केलं होतं ना, याही वेळी तसाच संदेश घराघरात पोहोचवण्याच्या तयारीत होतो आम्ही. मी तर दहा बारा देशभक्तीच्या पोस्टीही लिहूनही ठेवल्या होत्या. सुदैवाने त्याची गरज पडली नाही. 
           जाऊद्या साहेब बाकी काहीही असो.. मी मात्र चिंतामुक्त झालो. आता पुन्हा नव्याने लागतो कामाला..! पुन्हा नव्याने पोस्टींग, शेअरींग करतो..! तेही जोमात...!


तुमचाच सच्चा भक्त
संत बाताराम



-------------–---–-–––---------–---------------------------

प्रज्वल ढगे
4 मार्च 2020
बुधवार
Prajwaldhage98@gmail.com

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

फिदीफिदी : आम्हीच मराठीचे कर्तेधर्ते..!

फिदीफिदी 14

आम्हीच मराठीचे कर्तेधर्ते..!

जागतिक मराठी भाषेच्या दिनानिमित्त खास ‘शुद्ध मराठी’ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आता व्याप मोठा असल्याने कार्यक्रमाला मोठ्या मंडळींची हजेरी तर असणारच. मंचकावर  फुलांच्या माळा, हार, ध्वनिक्षेपकाची चाचणी ( माईक टेस्टिंग नव्हे) वगैरे-वगैरे काम बाकी असल्याने कार्यक्रमाला शून्य सेकंदाचा वेळ आहे. मंचाच्या मागे ( जीथे मीडियावाल्यांचे कॅमेरे जात नाहीत) दिग्गज पाहूण्यांच्या गप्पा रंगल्या आहेत. चंदूदादा, देवेनदादांच्या हातून सत्ता निसटल्यापासून त्यांना पित्ताचा त्रास सुरू झाल्याने दोघेही गंभीर चेहरा करून बसले आहेत. तर उद्धोदादा, अजूदादा मस्तपैकी चहा बिस्कीटांचा आनंद घेत आहेत. चंदूदादा, देवेनदादा आपला रुसवा फुगवा लपवण्याचा प्रयत्न करत डोळे बारिक करून  चहाचा झुरका सुर्रर्रर्रर्रर्र कण घेतात. आणि चर्चेला सुरुवात होते....

चंदुदादा :  काय यार किती वेळ कार्यक्रमाला...? (चीडचीड करुन               चहाचा घोट घेत)

उद्धोराव : ‘यार’ नव्हे ‘मित्र’ म्हणा. आपल्याला मराठी वाढवायची आहे, जगवायची आहे..! ( चहा पित पित गंभिरपणे)
    
        मित्र शब्द ऐकताच देवेनदादांचं पित्त खवळलं. त्यांनी रागात उद्धोदादांकडे पाहिलं आणि दात खात-खात चहाचा घोट घेतला.
 
देवेनदादा : नाही नाही चंदूदादा; तुम्ही ‘यार’च म्हणा. असंही दोस्तीला आजकाल कवडीची किंमत राहिलेली नाही.
    
       देवेनदादाच्या बोलण्याने उद्धोदादाच्या काळजाला शीळ टोचल्यासारखं झालं. अंगभर झिणझिण्या उठूनही उद्धोदादांनी सगळं काही आलबेल असल्याचा आव आणला.

उद्धोदादा : असं कसं... दोस्ती दोस्ती असते. काय म्हणता अजूदादा..?


अजूदादा : एकदम बरोबर... दोस्तीला सीमा नसतात... मानसाने कुणाशीही दोस्ती करावी...मी तर कुणाशीही दोस्ती करतो ब्वा... मला नवे नवे दोस्त करायला फार आवडतात... एका रात्रीत मी कुणाशीही दोस्ती करत असतो... काय म्हणता देवेनदादा. बरोबर ना..? 

       अजूदादांचे शब्द ऐकताच देवेनदादा भूतकाळाच्या पोटात गेले. देवेनदादांना एका रात्रीत भेटलेला तो 'जिगरी दोस्त' आठवला. आपल्या मित्राची आठवण येताच देवेनदादांच्या  पोटात कालवलं. दोस्ताची आठवण झाल्यामुळे चीडही आली. कारण एका रात्रीत मैत्री करणारा मित्र देवेनदादांना पहिल्यांदाच भेटला होता. त्यांना वाटलं की कमीत-कमी अर्धं दशक तरी आमचा मैत्रीभाव टिकून राहील. पण दिवस उजडताच भेटलेल्या दोस्ताने हातावर तुरी दिल्या. त्याच तुरीचे चटके त्यांच्या हाताला अजूनही बसत होते. चटके बसून बसून काळेनिळे झालेले हात लपवत देवेनदादा चहाचा कप ढवळत बोलू लागले.

देवेनदादा : बरं जाऊद्याहो ते... मी असं ऐकलंय की शाळेमध्ये काहितरी सक्तीचं होणार आहे म्हणे..? (भाल्यासारखी टोकदार नजर करुन तीच नजर त्यांनी आजूदादांकडे फेकली)

आजूदादा बोलणार तेवढ्यात...

उद्धोदादा : काहीतरी म्हणजे काय..? काय म्हणायचं काय आहे तुम्हाला.? आम्ही आमची मायमराठी सक्तीची करतोय...विद्यार्थ्यांनी ती शिकलीच पाहिजे ! आपल्याला माय मराठीचा अभिमान असलाच पाहिजे...! काय म्हणता अजूदादा..? (खड्या आवाजात मराठीचा उच्च आणि पराकोटीचा अभिमान असल्याचे दाखवत )

  अजूदादा : हा मग... एकदम बरोबर. मराठीचा अभिमान असायलाच हवा...ती आपली ओळख आहे...आपण आपापल्याला घराघरात मराठी पेरली पाहिजे..! मराठी सक्तीची झालीच पाहिजे..! (आपल्या कणखर आवाजात)

चंदूदादा : हो का...! मराठीचा एवढा अभिमान आहे म्हणायचा तुम्हाला..! बरोबर बरोबर..! मराठी प्रत्येकाने वाढविलीच पाहिजे. त्यासाठी आपल्या घरात भाषण ठोकणाऱ्या व्यक्तीला मराठी आली नाही तर, त्याला इंग्रजीमध्ये मराठी भाषण लिहून दिलं पाहिजे..! पण त्याला मराठीमध्येच बोलयला लावलं पाहिजे...विदेशात शिक्षण झालं म्हणून काय झालं...इंग्रजीतून मराठी शिकायला पण हिंमत लागते... बरोबर ना अजुदादा..?


आजूदादा :  आ...हो...हो... बरोबर बरोबर... ( आपल्या पार्थ बाळाची आठवण आल्याने खोकरत खोकरत)

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असलेले आजूदादा अडचणीत सापडतायत म्हटल्यावर उद्धोदादांनी चर्चा आपल्याकडे ओढली आणि बोलू लागले. 

उद्धोदादा : अजून मराठी वाढवायची असेल, तर आपल्याला मराठी सक्तीसोबतच आपले मौलिक जुने ग्रंथ विद्यापीठांमध्ये अभ्यासायला ठेवायला पाहिजेत...यासाठी लवकरच महत्त्वाचा निर्णयसुद्धा होणार आहे... (विद्यापीठांचे ओसाड पडलेले मराठी भाषेचे विभाग, पीएचडी मिळवून मिस्त्री काम करणारे डॉक्टर लोकं यांची आठवण आली. तरी देखील आपलं माप झुकू द्यायचं नसल्याने आपला चस्मा वर करत.)

देवेनदादा : नाही हो... शिक्षणाला घेऊन काय करता..? आता कोण जातंय विद्यापीठांत..! मी म्हणतो की कुसुमाग्रजांच्या कवितांपासून ते लतादीदींच्या मधुर गाण्यांपर्यंत मोठेमोठे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. मराठी गीतांना मंच दिला पाहिजे, मराठी गायकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हल्ली मराठी कुठेच ऐकायला भेटत नाही... एवढेच नव्हे... मी तर म्हणतो की.. मराठी वाढवण्यासाठी...( वाक्य पूर्ण करणार, तेवढ्यात देवेनदादांना आठवलं की, आपल्या अर्धांगिनीचं बिग बिंसोबत 'शुद्ध हिंदी' गीत, आणि नेमकंच व्हॅलेंटाईन डेच्या  दिवशी  'शुद्ध इंग्रजी'  गाणं प्रसारित झालं आहे. आपण अजून जास्त बोललो तर गोत्यात येऊ. त्यामुळे वाक्य अर्धवटच राहिलं, नव्हे नव्हे ते ठेवलं.)

आता अजूदादांचं नेहमीप्रमाणे डोकं फिरलं. आणि अजूदादा रागात येऊन बोलू लागले.

 आजूदादा : आम्ही काय करायला हवं ते आम्हाला सांगण्याची गरज नाही. ( उद्धोदादांकडे पाहत) आम्हाला मराठी वाढवायची कशी अनं जगवायची कशी? हे सगळं काही माहिती आहे. (देवेनदादा, चंदूदादांकडे पाहून बोचरी टीका केल्याच्या सुरात) 

 अजूदादा : मराठी भाषेची टिमकी वाजवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करणासाठी 2013 साली आम्हीच समिती नेमली होती... तुम्ही काय सांगता आम्हाला...(चहा संपल्याने कप खाली ठेवत) 

 चंदुदादाही काही कमी नाहीत. अजुदादांच्या या थेट हल्ल्याने चंदूदादा बिथरले. पण स्वतःला सावरत चंदूदादा बोलू लागले...

चंदूदादा : हो... हो... कुणाला शिकवत बसायला आम्ही काही रिकामे नाही... आम्ही आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी झगडणारच होतो... आम्ही अभिजात दर्जा देणारच होतो... पण काहीतरी अघटीत घडलं...तिघांनी येऊन धिंगाणा घातला.. आणि सगळंच राहून गेलं... नाहीतर आज  तुम्हाला आम्ही बोलुही दिलं नसतं... कळलं का..! ( गेलेली सत्ता, आणि अजूदादांच्या थेट बोलण्याने चंदूदादांना राग आला त्यामुळे मोठ्या कर्कश आवाजात.) 

वातावरण गरम झालं. सगळ्यांचा चहा पिऊन झाला. 

देवेनदादा : काय केलं हो तुमच्या गव्हर्नमेंटने मराठीसाठी..? ( रागात)


उद्धोदादा : गव्हर्नमेंट नव्हे सरकार म्हणा..! ( शांतपणे)

देवेनदादा : हो तेच तेच...! काय केलं तुम्ही ( अजुदादांकडे पाहत) 

अजुदादा :  हो सांगतो तुम्हाला.. थांबा.. (कंगवा काढून आपले केस विंचरत) 

आता वातावरण जास्तच पेटलं. पेटलेल्या वातावरणाची धग मंचापर्यंत गेली. आयोजकांनी हेरलं की काहीतरी गडबड होणार. विषय संपवायचा म्हटलं तर आपल्यालाच काहीतरी करावं लागणार, हे आयोजकाने हेरलं. बाकी सगळे कामं बाजूला ठेवून अजूदादा काही बोलायच्या आत आयोजकांचा आवाज आसमंतात घुमला...

हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!

हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!

कार्यक्रम सुरू होतोय. सगळ्यांनी मंचाकडे यायचं आहे. प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं...!


हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!

हॉल्लो... हॉल्लो....माईक टेस्टिंग..!


आता बोलून काही फायदा न्हवता. सगळीकडे चुळबुळ सुरू झाली होती. अजूदादांनी ओठांतला शब्द तसाच पोटात गिळत देवेनदादा चंदूदादाकडे कटाक्ष टाकला. आणि इच्छा नसताना शांत झाले. आणि आम्हीच मराठीचे खरे उद्धारकर्ते असल्याचा आव आणत चौघेही शांतपणे मंचाकडे चालू लागले...!

( सूचना :यातील सर्व पात्र काल्पनिक आहेत. काल्पनिक पात्रांचा कुणाशीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संबंध आला तर तो निव्वळ योगायोग आहे. बाकी काहीही नाही)


प्रज्वल ढगे
9923959974
Prajwaldhage98@gmail.com
दिनांक- 72- फेब्रुवारी- 2020

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

फिदीफिदी- 13, नमस्ते डोनाल्ड ट्रम्प....!

       फिदीफिदी- 13

        नमस्ते डोनाल्ड ट्रम्प...!


      आहो तुम्ही काहीही म्हणा. आमच्या प्लॅनिंग कमिटीचं काम जोमात सुरूय. आदरणीय नरेंद मोदी जेव्हापासून देशाचे पंतप्रधान झालेले आहेत, तेव्हापासून देशाचं वजनात 'प्रकर्षा'ने वाढ झालेली आहे. मोदींच्या सत्तेत येण्याने देशाच्या परराष्ट्र व्यवहाराला नवी झळाळी मिळाली तर आहेच पण मोदी या नावातच अनोखी जादू असल्यामुळे आज सगळं विश्व आपल्याकडे आदराने पाहू लागलं आहे. तुम्हाला हे सगळं काही खोटंच वाटणार. पूर्वग्रहदूषित, कलुषित मनं असलेले तुम्ही लोक आदरणीय मोदी साहेबांना कधीच नितळ नजरेतून पाहणार नाहीत. तसंही तुम्ही मोदी साहेबांकडे आदराने पाहा किंवा नका पाहू, आमच्यासाठी मोदी हे कायम शिरसावंद्य होते...! शिरसावंद्य आहेत...! शिरसावंद्य राहणार...!
       मोदी नावात वजन असल्यामुळेच ( छप्पन इंची छाती असणाऱ्या माणसाच्या नावात वजन असलंच पाहिजे) जगात महासत्ता असणारी अमेरिका आज आपल्या देशात येण्यासाठी आसुलेली आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतभूमीवर पाय ठेवण्यासाठी तरसत आहेत. तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटणारच नाही. कारण तुम्ही देशप्रेमाप्रती निष्क्रीयच आहात. तुमच्या माहितीस्तव ट्रम्प साहेब आपल्या देशाच्या दौऱ्यावर दोन दिवसांसाठी येणार आहेत. वॉशिंग्टन येथे ट्रम्प साहेब ( ट्रम्प तात्या म्हणायचं नाही. सन्मान द्यायचा त्यांना. दे पाहुणे आहेत आपले.)  माझ्या स्वागतासाठी  अहमदाबादेत 70 लाख भारतीय येणार आहेत' असं मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. हा एवढा पराकोटीचा अभिमान तो काय उगीच आहे का...? भारतीयांकडून स्वागत होणं म्हणजे आजकाल परदेशी लोकांना अभिमानाची गोष्ट वाटतेय. म्हणूनच ट्रम्प साहेब एवढ्या अभिमानाने त्यांच्या स्वागताच्या मधुर कहाण्या आख्ख्या विश्वाला सांगत आहेत.

           एवढं मोठं रामायण ऐकविण्याचं दुसरं काही कारण नाही.. फक्त आमच्यावर जे आरोप झाले ना त्यांना खोडून काढण्यासाठी, या आरोपांना उत्तर देण्यासाठी हा खटाटोप आहे. आम्ही लोकशाहीप्रेमी आणि लोकशाहीला जीवापार जपणारे लोक आहोत. तुमच्या विरोधाला आम्ही उत्तर देणारच. आम्ही ते आमचं परम कर्तव्य समजतो. तर मी म्हणत होतो की एवढ्या मोठ्या देशाच्या एवढ्या मोठ्या महनीय व्यक्तीचं स्वागत करायचं म्हटलं तर तयारी नको का करायला..? एवढ्या मोठ्या तयारीसाठी थोडा फार खर्च नाही का होणार..? आता 100 कोटी खर्च केले याची टिमकी वाजवत बसण्यापेक्षा याच शंभर कोटींच्या निधितून आम्ही किती जनहीताचे 'मेगा प्रोजक्ट' हाती घेतले हे ही जाणून घ्या जरा..! ट्रम्प साहेब अहमदाबादेत उतरणार आहेत. साहेब उतरल्याक्षणी त्यांना भारत भूमीत सगळं काही मजेत, आलबेल असल्याचं कळायला नको का..! तुमच्याच  इंदिरा गांधींनी 1971 च्या निवडणुकीत गरिबी हटाव चा नारा दिला होता. मात्र आतापर्यंत काँग्रेसला गरिबी संपवता आली नाही. आता या गोष्टी निस्ताराव्या लागणार की नाही. 'राष्ट्रीय गरिबी हटाव कल्याणकारी योजने'तून झोपडपट्ट्यांभोवती भिंत उभारली तर काय वावगं केलं. आजकाल प्रत्येक सोसायटीला आपलं हक्काचं असं संरक्षण कुंपण असतं की नाही..? झोपडपट्ट्यांच्या गरिब जनतेला असंच हक्कांच कुंपण तेही फुकटात बांधून दिलं तर त्यात काय बिघडलं. त्यांनाही चोऱ्या, लुटमार, दरोडे यांच्यापासून संरक्षण मिळेल, आणि आपला देश गरिबांची कशी विशेष काळजी घेतो याचा साक्षातकारही ट्रम्प साहेबांना होईल..! यात चूक ती काय..?

              'ट्रम्प कपल' सायंकाळच्या शांत समयी तेजोमहलाला (?) भेट देणार आहे. तेजोमहलाच्या (?) साक्षीने ट्रम्प कपल प्रेमाच्या चारपाच गुलाबी गोष्टी करू शकतं. त्यात अजून ट्रम्प मॅडमला जर यमुनेच्या 'निर्मळ जळात' पाय रोवून पाण्याचा थंडावा अनुभवत ट्रम्प साहेबांसोबत पाऊट करून चार-पाच फोटो काढावेसे वाटले तर यमुनेचं पाणी तलम, निर्मळ आणि स्वच्छ नको का वाटायला..! मग गंगेचं छोटूसं पाणी यमुनेला दिलं तर काय फरक पडतो. एवढ्या मोठ्या तेजोमहला (?) समोर पाऊट करून फोटो काढत असताना जर यमुनेची दुर्गंधी ट्रम्प मॅडमच्या नाकात शिरली तर त्यांच्या फोटोसेशनचा खेळखंडोबा नाही का होणार..! या साऱ्या शक्यता लक्षात घेता यमुनेची दुर्गंधी लपवण्यासाठी जर गंगामाईचं पाणी यमुनेत सोडलं तर काय ती चूक केली.?. यावर एवढं मोठं रणकंदण करण्याची काय गरज..? तुम्हाला दीड फुटांपर्यंत पाणी यमुनेत सोडण्याचा हा निर्णय फारच टोचत असेल तर या पाणी सोडण्याच्या योजनेला ‘नमामी गंगे’सारखं ‘नमामी यमुने’ असं नाव द्या हवं तर..! काय म्हणता..?
         बाकी कोणे एकेकाळी काँग्रेसच्या नेहरूंनी ड्वाइट आयसनहॉवर यांना भारतात आणलं होतं. इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सॉन यांना भारतात बोलावंल, जॉर्ज बूश, बराक ओबामा यांना सिंग साहेबांनी भारतभेटीला बोलावंल. तेव्हा आम्ही असंच बोललो का..? आम्ही घेतला का तुमच्या खर्चाचा धांडोळा..? त्यावेळच्या तुमच्या खर्चाची आम्ही चौकशी करायला घेतली तर नेहरू घराण्याची ( काँग्रेसची नव्हे , कारण नेहरू घराणं म्हणजेच काँग्रेस आहे, असं आम्ही समजतो...) कित्येक गुपीतं  बाहेर येतील, तुमच्या आतापर्यंतच्या  खर्च़ातून हजारो कुटुंबातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून दारिद्य्र हद्दपार झाले असते.
          आधीच सांगून ठेवतो. आम्ही आदरणीय ट्रम्प कपलला सोन्याच्या ताटात मिष्टान्न आणि चांदीचा वर्ख असलेल्या टी-ट्रेमधून 'चहा' देण्याचं ठरवलं आहे. चहामध्ये प्रचंड जादू असते. चहाने कित्येकांना मोठमोठ्या हुद्द्यावर नेऊन ठेवलं आहे. 'चहा विकणारे' आज करोडपती झाल्याचे कित्येक उदाहरणं आहेत. मग ट्रम्प साहेबांना 'चहाची संस्कृती' असलेल्या देशात चांदीच्या कपात चहा दिला तर गोंगाट करण्याचं काही कारण नाही. चहावर आमचं खूप प्रेम आहे. ट्रम्प साहेबांना आम्ही सोन्याच्या ताटात जेवू घालणार आणि चांदीच्या कपात चहा पाजणारच..!

         बाकी तुम्ही आमच्या समोर कितीही मोठा दंगा करा, टीका करा. आम्ही हे विकासकाम करणार. आम्ही 'केम छो डोनाल्ड ट्रम्प'..! नाही नाही 'नमस्ते ट्रम्प...' म्हणणार म्हणजे म्हणणार....! 

प्रज्वल ढगे
23- feb- 2020
रविवार


 





    

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

बधिर मी

बधिर मी

मह्या भोळ्या पिरमाचं रोप दुष्काळी पेरलं
मह्या भावनांचं बीज म्या माळरानी झोपाविलं.......

मोह पिरेम हे भोळं झालं खेळ आन सोंग
डोंबाऱ्याच्या दावणीचं मी मूकं लाचार माकडं......

तिचं सुपीक हो रानं मन पिरमाचा झरा
तोंडाला मी झऱ्याच्या थेंबा थेंबाला पोरका.......

तिच्या मिठीला आतुर देवा आदिकांची आस
झेलण्यास तप उभा उभा तिचं इवलं टिपूसं......

हसण्यांन रुसण्यानं मोह पोखरलं मन
पोखरल्या मनामंदी ठुलं आठवाचं सोनं.....

काळ्या मातीवणी डोळे त्यात भरलेलं इस
आठवांचा थेंब जणू वळवाचा ह्यो पाऊस........

प्रियानुज ढगे

बंदिस्त खाट

आलीस का?
ये, ये, बस.
आसि या डोळ्यांतून आसवं गाळू नकोस,
तुझे मऊ गाल या अश्रुंनी भिजवू नकोस.

या मऊ गालांना आता,
कधी रग्गड काळे,तर कधी कोवळे,कोरडे ओठ चावतील,
तर कधी चावलेल्या दातांचे निशानही सोडतील......!

कधी करतील तुला हजारदा विवस्त्र,
आणि चढतील तुझ्यावर रोज एखाद्या पशुसारखं....!
एका नरकात फेकलेल्या कळीला चुरगळून,
घेतील आनंद कामसुखाचा,
स्वर्गसुखासारखा.........!

इथे तुला सत्य कधीही कळणार नाही,
चार बाय चार,
खोलीचं तुझं विश्व..
तुला कधी सांगणारही नाहीत,
तुला उपभोगणारे त्यांच खरं नाव आन गाव......!

ऊठ आता तू तयार हो,
तुझ्या प्रत्येक किंकाळीवर ठरलेला आहे हिस्सा,
या जागेचा, या वर्दीतल्या भाडखाउंचा....!
या, या, फुकटचं खाणाऱ्या खंडणीखोरांचा,
आणि,
खिळखिळ्या झालेल्या माझ्या या सांध्यांच्या दुरुस्तीचासुद्धा.....!

पण तू मला भिऊ नकोस,
कारण,
मि पाहिल्यात तुझ्यासारख्या खुपसाऱ्या.
चघळून चघळून तंबाखूसारख्या फेकल्या गेलेल्या,
तर कधी फुकटात वापरून माझ्या अंगावर झोकून दिलेल्या....!

आता मीही थकलोय या हेलकाव्यांना,
पण मी तसा नाही जसा तू समजते.
या लिंगपीसाट दुनियेत,
इथं मीच आहे एकटा पुरुष लिंगी....!
ज्याला तू बिलगू शकतेस,
आपल्या दिगंबर देहाने........!

आणि ऐकत राहीन मी तुझ्या या हुंदक्यानां,
तुझाच एक बंदिस्त खाट.
तसंच...!
जसं ऐकलंय मी,
तुझ्यासारख्याच तुझ्या अनंत बहिणींना...!!!!

प्रियनूज राजाभाऊ ढगे.



बणाई

उन्हाळ्याचं ऊन जसंजसं तेजाळत होतं,तसंतसं आंग घामाचे पन्हाळ वकू लागलं.बळीराजानं आपलं रान नागवं करून उन्हाला तापवित बसिवलं होतं. कुठंतरी साळुंखी आपला चिवचिवाट करून लपलपल्या अंगाला आडूसा शोधत होती.बेभान सुटलेलं वारं, उन्हासंग शिवाशिव खेळत होतं. दोघजन मिळून रंग्याच्या घरी असणाऱ्या लिंबाला कानाखाली मारून गदागदा हालवीत होते.हालीवल्या सरशी पिकलेल्या लिंबोळ्या जीव सोडून जमिनीवर आपलं डोकं फोडून घेत होत्या.खाली लिंबोळ्यावर माशांचा थर साचला होता.लिंबाखाली एका कोपऱ्यात लाकडी बाजावर आपलं मळकं गोधडं आथरून सुगंधामाय घोरू लागली.तिच्या उशाला असणाऱ्या मळक्या लुगड्याच्या चिंध्या आण फाटक्यातुटक्या बोनदऱ्या मधी बांधलेली बॉटल,तिची होत असलेली आबाळ दाखवत होती.बाजच्या पायथ्याला बुधवड्यातली तांबडी कुत्री हापहाप करून लाळ गाळीत पडली होती.
पावसाळा आन उन्हाळ्यात मानसायची किलकील असणारा हा बुधवडा सुतक आसल्यावणी शांत आणी निपचित पडला होता.दूधपिते पोरं दूध तोंडात घेऊन आपल्या आईच्या कुशीत निपचित पडले होते.शहाणे-सुरते आपापल्या परीनं स्वतःला गर्मीपासून वाचावीत होती.वाड्यातली तरणीबांड पोरं गावात चाललेल्या लफडयांच्या गप्पा करीत आईच्या पारावर बसली होती.ही पोरं आख्या गावाची मायभईन इथंच एक करीत !कोन कोणाच्या मागं? कोण कोणाला आवडतं ,हा सारा प्रपंच याच पारावर होत असे.
पोरांची मैफल जमली.कचरू,नाम्या,सुभान,दादाभाऊ,राज्याभाऊ, सगळेजण गप्पा मारीत बसले होते.मधीच सुभाण्या काहीतरी चाळा करी आन साऱ्या गल्लीची शांतता त्यांच्या हासण्यामुळे खड्ड्यात गाडल्या जाई. दुपारच्या एक वाजल्यापासून यांची मैफल रंगलेली,ती आणखीनच रंगत-रंगत पार सूर्य बुडायला लागेपर्यंत चालूच होती. शेवटी सुर्यदेवानं आपलं उन्हाचं जाळं कमी केलं आणि गार वारा सुटायला लागला.आता कंबरेचा कना कुरकुर करू लागला.बसून-बसून पोरं कटाळली. सगळ्यांना घराची आस लागली. सांजच्यापारचा चहाचा वास नाक व्यापु लागला.सगळ्यांनी अंग झटकलं.सगळे उठू लागले.
तेव्हड्यात,
" ये कुठं हाईस रे ?" वाऱ्याच्या झुळूकीसंग रडकुले आणि हुंबत असलेले तुटक-तुटक शब्द,राज्याच्या कानाला स्पर्ष करून गेले.
"ये, तुम्ही काही आईकिलं का?"राज्यानी बाकीच्या पोरांना विचारलं.सगळ्यायनी आडव्या माना हालविल्या.
राज्या आणखिनही ती किंकाळी इसरला नव्हता,वेदनेने भरलेला त्यो आवाज आणखिनही राज्याचं मस्तक सोडीत नव्हता.तो उठला आपलं बुड झटकून पायात ती खिळे मारलेली चप्पल घालू लागला.सगळे निघायला लागले.
"लवकर यी रे$$$$$$" हवेशी झुंज करत हा आवाज मात्र सगळ्यायचं काळीज चिरून गेला.राजुच्या काळजात पाणी भरलं.डोळेही पाण्यानं डबडबले.ह्यो आवाज सगळ्यायनी आईकिला होता.राजुचे डोळे पाण्याने भरले.कुणाचाही ईचार न करता आईच्या देवळाच्या दहा-बारा पावलावर असलेल्या त्या बोळीतून, तो सुसाट वेगानी पळत सुटला.त्याच्या मागोमाग सुभान,नाम्या,सारे दगडु लागले.सगळ्यांची पावलं एकाच जाग्यावर रुतली.फेंदारलेल्या डोळ्यायनी सगळे एकटक पाहू लागले.समोरचं ते दृश्य पाहून कोणाला काहीच उमजेना.
ती ,'बनामाय' होती.हाड आन मास एक झालेली बनामाय!!!!!!
एका खोकल्याच्या उबाळीसंग ती बाजाऊन खाली पडली होती.कुत्र्यायनी उखरलेल्या मातीत तोंड खुपसून उसासे टाकीत होती.तडफडत होती!!बाजूच्या दगडावर डोकं आदळल्यामूळं सुजून पार कांड्याइतकं भाईर आलं होतं. आधीच बुधवाडा गावाच्या भाईर!आन त्यात पार गल्लीच्या ढुंगणाला दोन-चार हाताच्या बोळीपलीकडं शासनानं बनामायला राहायला घरकुल देलं होतं. त्या घरकुलात ती एकटीच राहायची.सारी पोरं डबडबल्या नजरेने त्या घराकडं पाहत होते.एकमेकांकडे पाठ करून जमीन फाडून निघालेले लिंबं पार आभाळाला भिडले होते.घरकुलाच्या दोन खोल्यायपुढं एक बारीक खूजं खोपटं म्हतारीनं स्वतासाठी बनवलं होतं. समोरचं आंगण कोंबड्यायनी उखरून उखरून पार खरूज आल्यागत केलेलं.त्या टीचभर खूरुड्यात जाण्याची कोणाचीही हिम्मत होईना! कोणीही त्या म्हतारीकडं जाईना.झोपड्यातून येणारा तो घाण दर्प पोटात ढवळाढवळ करत होता.राजेभाऊचं मन शांत बसत नव्हतं.त्याची धकधक अजूनच वाढत होती.शेवटी बेंबीच्या देठापासून त्यो ओरडला
"चला रे बनामायला भाईर आणू, जायची मरून बिचारी!"
बनामाय हुंबु लागली "कुठं गेलास रे, कव्हा येशील!"
शेवटी राजेभाऊच पुढं गेला,वाळलेल्या पऱ्हाटीवानी आपल्या दोन्ही हातात त्या हालक्या झालेल्या बनाआक्काला त्यानं उचलून आणलं.लिंबाच्या सावली खाली, त्या खरजूल्या मातीत,त्यानं तीला बाहेर आणलं.बाकीच्यांच्या जीवात जीव आला .सगळेजण हालचाल करायला लागले.दादाभाऊ अस्ताव्यस्त झालेलं लुगडं सावरीत होता.कोपऱ्यात ठेवलेल्या मान मोडक्या डेऱ्यातून सुभान पाणी घेऊन आला.त्यो मळकटलेला गिलास तसाच्या तसा बनामायनं आपल्या तोंडाला लावला.घट घट असा पाण्याचा आवाज येत होता.पाणी तिच्या पोटात जात होतं. तसा राजेभाऊच्या जीवात जीव येत होता.म्हतारीचा जीव हापकत होता.वर सांजचा सोसाट्याचा वारा ,आन उरातील खोकला बनामायला स्थिर होऊ देत नव्हता.

"काय झालं बना आक्का,कामून बोंबलू लागली खुळ्यागत!."काळजातली भीती लपवीत राजेंभाऊनं शब्द फेकला.
म्हतारीला स्वास घेणपन अवघड होऊ लागलं.त्या गटमटीत तीन आपलं दात नसलेलं तोंड इचकिलं, आन हासल्यासारखं केलं.हे हसणं,हसणं नव्हतं! ते होतं, एक मुक्त होत असल्याचं समाधान!ते होतं एका एका मुक्त आकाशात जाण्याचं स्वीकारलेलं आमंत्रण!पोरांच्या काळजाचा ठोका वाढला.साऱ्यांना भडभडायला लागलं.राजेभाऊच्या डोळ्यांत पाणी तरळलं .बुबळायवर आसवांची झालर आली.त्या झालरीवर बनामायच्या आयुष्यातील चित्र उभे राहू लागले!!!!!!!!!!!
बनामाय! गावच्या मरीआईला सोडून दिलेली देवदासी होती.भर जवाणीत ,भरल्या अंगानी तीनं आपल्या जवानीला जपत आईची सेवा केली.ती आईला रोज शेंदूर लावी.रोज तीचं झाम्पर बदली.सणासुदीला हिरवा चुडा अर्पण करी.पुनवलां,एकादशीला निवद आन चपात्या आईपुढी ठेवी.तिचं लग्न झालं होत.सोपान सोबत,हा सोपान जन्मताच अपंग.त्याला काही काम होत नसायचं.आईपुढी आलेल्या निवदावरचं ती कशी बशी जगायची.सोपान हा काही साधा नव्हता.त्याला अधून मधून घुरं येई !आन त्या धांदलीत त्यो बनाईला पार ढोरागत मारी.कंबरात मांडीवर कुठंही लाकडं मारी,नखांनी ओरबाडी. आन बनाई मुक्या गाईसारखी ओरडायची.हे मार खानं तिच्या जन्माला पूजल्यालं. असचं एका दिवशी बनामाय चुलीजवळ चहा करू लागली.ती आपल्याच धुंदीत होती.अचानक सोपाननि तिचे केस धरले.आन तिला मातीत घोळसू लागला.बनामायला कळलं की,त्याला घुरं आलं म्हणून!ती ठणठणा बोंबलू लागली .सोपान गप-गप म्हनून तिचं तोंड दाबू लागला.पण बनामाय दाद देत नव्हती.शेवटी सोपानआण्णा जवळ पडलेली फुकणी घेतली.आन फाडकन बनामयच्या थोबाडावर मारली.एकामागून एक त्यो तिच्या तोंडावर त्या लोखंडी फुकनिणे मारू लागला.बणाईचं तोंड रक्तानं माखलं. सारा बुधवाडा जमा झाला.सगळे आण्णाला धरू लागले.पण त्यो हत्तीवणी आडदांड !तो कुणाला आवरेना!बणाई तोंडाला हात लावून जोरा जोरात बोंबलू लागली.सगळी भावकी हळहळू लागली.बनामयची सगळी बचाळी फुकणीच्या मारासंग भाईर पडली होती.तिचे रक्तानं माखलेले दात मातीमध्ये विखुरले होते.
पुढं सोपान अण्णांचं आजरपन वाढलं.त्याच्या शेवटच्या दिवसात आण्णा इलाज आन भाकरिपाई आळ्या पडून मेला.ह्या येड्या नवऱ्यासंग तीन आखा जन्म काढला.त्याचा मार, राग,सगळं काही सोसलं. आन देवानही तिला दुःखाच्या सागरात आनंदाचे मोती दिले.सोपाना पासून तिला भरपूर लेकरं झाले.दहा लेकरं !! सरेंच्या सारे पोरचं!पन बापावानीच सगळे भूकमरी आन गरिबीपाई मेले.बनामायला वाटायचं एक तरी लेकरू जगावं.ती देवासमोर हात जोडायची.त्याला इनवायची. आपल्या आईमायला ती नवस बोलायची.पोटचा गोळा जगावा म्हणून चंद्रपुराला आणवानी पायांनी जायची.काय माहीत कशामुळं पण आईमायनं एक सुद्धा लेकरू जिवंत राहू दिल नाही.या तिच्या लेकरायला कव्हा भाकर मिळायची नाही.पोरं दारोदार जाऊन भीक मागून खात. कधी कोणी वाळलेले कुटके देई,तर कोणी हुसकावून लावी.असाच एक पोरगा सित्या पार मोठा झाला होता.चांगला लग्नाच्या वयात आला होता.पोटाची आग शमवण्यासाठी त्यानं आईपुढचे निवद खाल्ले.आन काय माहीत काय झालं?सीत्याच्या पोटात उमचळायला लागलं.आन पाय खोरून,भीतीवर डोकं आपटून त्यानं आपला जीव सोडला .पुढं एवढ्या मोठ्या घरकुलात बनामाय कैदासीनिवाणी एकटीच राहू लागली.
सारा इतिहास राजेभाऊच्या डोळ्यात भरत होता.त्याचे डोळे पाण्याने डबडबले.लहान लेकरासारखा तो ढसाढसा रडू लागला."आर काय झालं रे राजू?आसं कामून रडतुयास?येईन न त्यो? राजुला भान आलं.त्यानं पटकन डोळे पुसले.त्यो आणेबा होता,तिचा अकरावा मुलगा सोपान अण्णांन तिला दहा लेकरं दिले.आणेबा अकरावा होता. धाकट्या जाऊचा मोठा मुलगा. तो शहरात मास्तरकीच शिक्षण घेऊ लागला.पार दोन वरीस झाले पण त्यानं गावात पाऊल ठेवलं नव्हतं. पैसे लागले तर ,फक्त बनामायला पत्र पाठवित असे.आलेलं पत्र राजेभाऊं तिला वाचउन दाखवी. बणाई आनंदानं पत्र आलं म्हणून ,होईल तेवढं करून पैसे देई.आण राजू इमानदारीनं ते पैसे आणेबाच्या नावानं मनी ऑर्डर करी.

आज पाच महिने झाले,ना आणेबाचं पत्र ना तार!!!
म्हतारिचा जीव फक्त एकाच आसेवर जगतोय.आज पत्र येईल.उद्या माझा आणेबा मला भेटायला येईन.दिवसामागून दिवस जात होते.आणेबाचं पत्र येत नव्हतं.आणेबाची चाहूल लागत नव्हती.
आता म्हतारीचा श्वास घाबरा झाला.बणाई बोबडी बोलू लागली.तिची दमछाक होऊ लागली.तश्या स्थितीत तीनं राजुचा हात धरला.आन बोलू लागली."राजा तू जाय!त्याला घेऊन यी." राजेभाऊं उठला.त्यानं पुन्हा डोळे पुसले.आलेला घाम कॉलरणी पुसला.शेम्बडान भरलेलं नाक मातीत शिकरलं. आन बोलू लागला ...."हो आजे .....मी आत्ता जातो.. त्याला आत्ता घेऊन येतो...तुला काहीही होणार नाही.तू काळजी करू नकु...."
सूर्य मावळतीला लागला होता.मऊ वारं वाहू लागलं.म्हतारीचा श्वास थांबत होता.
आन........
राजेभाऊं आणेबाला आणायला आणवानी पायानी धावू लागला......

तळटीप- ही कथा काल्पनिक असून.या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत.कुठल्याही सत्य घटनेशी कसलाही संबंध नाहीं. संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा..........

प्रियानुज ढगे
Priyanoojdhage@gmail.com



लैंगिकता आणि एड्स

शेवटच्या महि्न्यातील पहिला दिवस.हा दिवस येतो.प्रत्येकाचे सामाजिक भान जागृत होते.विचारवंतांची लेखणी खनखनते.पांढऱ्या कागदावर लेखणीचे वार होतात.पेपरात लेख छापून येतो.दिवस संपतो आणि सगळं काही त्या पांढऱ्या कागदावरच सीमित राहतं.औचित्य असतं जागतिक एड्स दिनाचं!असो!!
मुळात एड्स हा अतिशय गंभीर विषय.कधी आईच्या उदरातून बाळाला होणारा. तर कधी कामक्रीडेतून(लैंगिक संबंध हा शब्द टाळतो.कारण विषय फार गंभीर होऊन जातो.पण तो जास्त काळ टाळता येणार नाही!) आपल्या पार्टनर कडे संक्रमित होतो.वैज्ञानिकतेच्या चष्म्यातून पाहायला गेलं तर अगदी साधा आणि सोपा हा रोग.आपणाहून कुणाकडे जात नाही.किंवा कुणाला बोलवतही नाही.आपल्या सौम्य चुका, हलगर्जी पणा,अनास्था,किंवा हव्यासापोटी आपण त्याला आमंत्रित केलेले नसतानाही तो येतो.आणि कायमचा पाहुणा म्हणून राहतो,तो गौऱ्या स्मशानात जाईपर्यंत!
माणूस हा समाजशील प्राणी आहे.अन्न, वस्त्र,आणि निवारा,या बरोबरच त्याला त्याच्या भावणासुद्धा तेवढ्याच प्रिय वाटतात. भावणाचे विविध प्रकार .त्यात लैंगिक भावना ही विशेष,आणि सर्वांमध्ये असलेली.सर्वव्यापी!लैगिंकता हा विषय आला की भारतीय लोक सावध आणि सभ्य होऊन जातात.जसे की यांना या विषयाचं ज्ञान एकदम शून्य!आणि योगायोगाने एड्स या रोगाचा लैगिंकतेशी जवळचा संबंध.जोपर्यंत आपण असेच स्वतःला असे सभ्य समजत राहू आणि लैगिंकतेबद्दल खुलेपणाने चर्चा करणार नाही,तोपर्यंत एड्सवर चर्चा करणे आणि मोठे मोठे लेख लिहिणे हे सगळं व्यर्थच!एड्स हा रोग असुरक्षित लैगिंक संबंधाने होणारा रोग आहे.भारत सरकारच्या ,एड्स नियंत्रण संस्थेच्या २०१५च्या ताज्या अहवालानुसार ८७%एड्सचा प्रसार हा असुरक्षित लैगिंक संबंधाने होतो.एड्सग्रस्त पालकांकडून बाळास प्रसारित होण्याचे प्रमाण हे ५%आहे.संक्रमित रक्ताने हा रोग नगण्याच्या थोडे पुढे जाऊन म्हणजेच १% प्रसारित होतो.या रोगाचा बळी, तरुण वर्ग,ते भारताचा उत्पादक वर्ग म्हणजे वय वर्ष १५ ते ४९ मध्ये एकूण एड्सग्रस्तांपैकी ०.२६% इतका आहे.सद्यास्थितीला भारत देशात,सरकारी आकड्यानुसार २१.१७ लाख लोक हे एड्सने ग्रस्त आहेत.हा आकडा २०१७चा आहे. २०१५साली हीच संख्या २२.२६ लाख इतकी होती.आकडेवारीकडे पाहिले तर समजते रोगीची संख्या कमी होत आहे.पण ही संख्या कमी होण्यास लागलेला कार्यकाळ पहिला तर कळतं की,रोग्यांत झालेली घट ही तेवढी सुखकारक नाही.
काय कारण असावे,की सात वर्षाच्या कार्यकाळात ही संख्या जवळपास फक्त एका लाखाने कमी झाली.काय कारण असावीत की आणखिनही समाज तेवढा सजग आणि जागरूक झालेला नाही? खोलात विचार केला ,तर अनेक कारणं दिसतात.त्यापैकी,लैंगिकता या विषयावर चर्चा करण्यास असलेली अनास्था,आणि असलेला संकुचित दृष्टीकोन.दुसरे महत्वाचे कारण म्हणजे अज्ञान आणि अर्धवट ज्ञान.तिसरे म्हणजे जबाबदारीच्या भूमिकेच्या गांभीर्याची असलेली चणचण.विस्ताराने चर्चा करावयाची झाल्यास,अज्ञान आणि अर्धवट ज्ञान हे नेहमीच विघातक आणि घातक असते.या अज्ञानापोटी 'चला काही होत नाही'हा शब्द सर्रास वापरला जातो.आणि असुरक्षित यौन संबंध(समागम) घडवून आणल्या जातो.या असुरक्षिततेची दुसरेही अनेक कारणे आहेत.उदाहरणार्थ, कंडोम वापरल्याने समागमाचा पूर्ण आनंद भेटत नाही हा भ्रम असणे.असले अज्ञान घेऊन कित्येक लोक जगत जगतात.आणि माणूस गिळंकृत करणाऱ्या रोगास आमंत्रण देतात.अर्धवट ज्ञान हेसुद्धा खूप भयानक असते.याचे उदाहरण द्यायचे झाल्यास,कंडोम वापरावा हे माहीत असते.पण तो वापरण्याची पद्धत कोणती,याबद्दल 'तो'अनभिज्ञ असतो.तिसरे कारण म्हणजे जबाबदारीच्या भूमिकेबद्दल जागरूक नसणे.नीतिमत्ता सांभाळून आपण आपल्या कुटूंबाचेच नाही तर भारताचे अविभाज्य घटक आहोत.या जाणिवेची उणीव असने आणि याच उणिवेपोटी कळत नकळत बऱ्याच चूका होऊन जातात.आणि सर्वज्ञात परिणाम नंतर समोर येतात.
एड्स रोगविषयी जरी समाज जागरूक होत असला तरी सामाजिक पुढाकार घेऊन युवकांनी जनजागृती करणे अपेक्षित आहे.योग्य प्रशिक्षण घेऊन युवकांनी खेडोपाड्यात जाऊन लोकांना एड्स विषयी योग्य माहिती दिली पाहिजे.महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याशी संलग्नित राहून औषधांचा प्रसार ,आणि उपायांचा प्रचार करणे महत्वाचे आहे.विविध संस्था,एन. जी.ओ. आपल्या परीने कार्य करत असतात.त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.रुग्णांना आपुलकीने वागवण्यासाठी कुटुंबियांना तसेच इतर लोकांना विश्वासात घेऊन हा रोग भयंकर नसून ,त्याचे वाईट पैलू तेवढ्याच सहजतेने त्यांच्या समोर मांडले गेले पाहिजेत.
शेवटी मीही फक्त एक लेख लिहितोय. माझा हा लेख सुद्धा 'जैसे थे'नसावा!मी मुद्दाम 'एड्स आणि लैगिंकता या विषयावर भर दिला आहे.जेणेकरून खुली चर्चा व्हावी.आणि तेवढाच माझा हातभार लागावा जनजागृतीसाठी!!!



गोंधळातून गरुडभरारी

गोंधळातून गरूडभरारी...                   मुळात व्यक्तीकेंद्रीत होत चाललेल्या आजच्या राजकारणात, देशातल्या मातब्बर अशा 23 नेत्यांनी थेट पक्षाध...